श्रावण महिन्यातला नागपंचमीचा दिवस खूपच महत्वाचा समजला जातो. श्रावण हा भगवान महादेवांना समर्पित असलेला महिना असल्याने या महिन्यात येणाऱ्या नागपंचमीला विशेष महत्व आहे.
या दिवशी संपूर्ण देशात नागांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते. या दिवशी त्यांना दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि निरोगी आयुष्याची कामना केली जाते.
नागपंचमीच्या पूजा करताना अनेक ठिकाणी नागांच्या फोटोची किंवा रांगोळीने काढलेल्या नागाची पूजा केली जाते. मात्र महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा एक गाव आहे, जिथे चक्क जिवंत नागांची पूजा केली जाते.
अनेक दशकांपासून नागपंचमीसाठी जिवंत साप, नाग पकडून त्यांची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. या दिवशी या सापांची पूजा होते.
केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगभरात हे बत्तीस शिराळा गाव याच जिवंत नागाची पुजा करण्याच्या प्रथेसाठी ओळखले जाते. या गावात जशी नागपंचमी साजरी होते तशी नागपंचमी कुठेच होत नाही.
दहाव्या अकराव्या शतकात महायोगी गोरक्षनाथ महाराज लोकांचे प्रबोधन करण्याचे हेतूने सांगलीतील शिराळ्यात आले होते त्यांचे वास्तव्य सतीचा ओढा व मोरणा नदीच्या संगमावर
होते.
ते एकदा भिक्षा मागण्यासाठी शिराळा गावातील महाजन यांच्या घरी आले.तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमी म्हणजे नागपंचमीचा मात्र त्यावेळी एक गृहिणी मातीच्या नागाची पूजा करत होती त्यामुळे तिला भिक्षा देण्याची विलंब झाला त्यामुळे नाथांना तिष्ठत उभे राहावे लागले जेव्हा ती गृहिणी भिक्षा देण्यासाठी बाहेर आली, तेव्हा नाथानी तीला उशिर का झाला याचं कारण विचारले. नागपंचमी असल्याने मी नागदेवतेच्या पूजेमुळे उशीर झाल्याचे कारण त्या गृहिणींने गोरक्षनाथांना सांगितले
त्यावेळी त्यांनी तिला जिवंत नागाची पूजा करणार का, असे विचारले आणि तिने देखील त्यांना लगेच होकार दिला. आपल्या मंत्र सामर्थ्यावर त्यांनी खरा नाग त्या ठिकाणी प्रकट केला तेव्हापासून शिराळ्यात जिवंत नागाची पूजा सुरू झाली असे जाणकार सांगतात.
या गावात नाग पकडण्यासाठी जवळपास ७०ते ७५ मंडळे कार्यरत आहे आणि शासनाने सुद्धा या नागपंचमीसाठी परवानगी दिली असून सापाची विशेष काळजी या गावात घेतली जाते आबाल वृद्ध सुद्धा हा नागपंचमीच्या सोहळ्यात सहभागी होतात
नागपंचमी दिवशी अंबाबाई देवळात प्रथम जिवंत नाग देवतेचे पुजन केले जाते.
गोरक्षनाथांनी जिवंत नागाची पुजा ज्या महाजन घराण्यातील गृहिणी करावी करून घेतली त्या महाजनांच्या घरातुन पालखी निघते या पालखीत गोरक्षनाथाची मुर्ती आणि सापाची प्रतिमा असते. या घरात पालखी समवेत येथे जिवंत नागाची पूजा केली जाते आणि त्यानंतर हा पालखी सोहळा सुरू होतो संपूर्ण गावात ही पालखी फिरते आणि अंबाबाईच्या भेटीसाठी निघते.
या सोहळ्यात नाग सोडण्याचा मान कोतवाल समाजाकडे यांच्याकडे असतो तर पालखी उचलण्याचा मान भोई समाज यांच्या कडे असतो. तर पहिली नागाची पूजा करण्याचा मान महाजन कुटुंबाकडे असतो
येथील स्त्रीया नागाला आपला भाऊ मानतात. त्याचा उपवास करतात. तो सूक्ष्म रूपाने घरात येईल, त्यास कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून नागपंचमी दिवशी स्वयंपाकात चिरणे, तळणे वर्ज्य केले जाते.
१९५३ साली नागपंचमी कशी साजरी केली जायची, याची माहिती १९५४ च्या किर्लोस्कर मासिकात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर नॅशनल जिऑग्राफीने बनवलेली शाॅर्ट फिल्ममुळे शिराळ्यातील नागपंचमीला संपूर्ण जगभर प्रसिद्धी मिळाली.
नागपंचमीच्या दिवशी या गावातील कोतवाल कुटुंबीय राजगिरा, शेवगा, वांगी, दोडका, वाटणा, वरणा, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, भेंडी, गवारी, श्रावण घेवडा, मुळा, चवळी, मेथी, शेपू, तांबडा, भोपळा, भोपळीची भाजी, आळूवाडी, बिन, लोणचे अशा २१ भाज्यांचा नैवेद्य नागाला दाखवतात.
नागाची पूजा केल्या शिवाय महिला उपवास सोडत नाहीत. या नागपंचमीत आनंद नागराज मंडळ ,नागपूजक नागराज मंडळ, रेणुका नागराज मंडळ,न्यू स्टार नागराज मंडळ, नृसिंह नागराज मंडळ या सारखी अनेक मंडळे कार्यरत असताना. नाग हा पर्यावरणाचा घटक आहे आणि त्याचे संवर्धन करणं हे आपली जबाबदारी आहे असा सांगणारा हा नागपंचमी सणाचा आगळावेगळा सोहळा अनुभवायचा असेल तर एकदा नागभुमी बत्तीस शिराळ्यातील नागपंचमीत सहभागी व्हा…