कोलगाव नाईकबाग येथे गणेश विसर्जन गेले कित्येक वर्षे केले जात होते. जवळपास ४०० ते ४५० गणपती विसर्जन येथे केले जातात. मात्र तिथे व्यवस्थित जागा उपलब्ध नव्हती. गणेश विसर्जन घाट आणि पायऱ्या बांधण्यासाठी नागरिकांकडून मागणी होत होती. प्रयत्न सुद्धा केले गेले होते मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ते पूर्ण होऊ शकले नाही.
मात्र बलवंत कुडतरकर यांच्या पुढाकाराने आणि बाबुराव चव्हाण, संजय पाटणकर, सुरेश दळवी, रुपेश कुडतरकर यांच्या सहकार्याने हा गणेश विसर्जन घाट बांधण्याचा घाट घातला गेला. कोणत्याही राजकीय, शासकीय मदतीशिवाय हा घाट बांधायला सुरुवात केली. शेवटी त्याचे गणेश चतुर्थी दिवशी लोकार्पण करण्यात आले.
उदघाटक ग्राम पुरोहित सुरेश पुराणिक सर, अध्यक्ष साबाजी ( चंदन ) धुरी, मान्यवर पुंडलिक राऊळ, बाबुराव चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य संयोगिता उगवेकर, हेमांगी मेस्त्री,बाबुराव चव्हाण, संजय, पाटणकर, सुरेश दळवी, रुपेश कुडतरकर, फ्रँकी डॉन्ट्स, नारायण जाधव, नारायण राणे, आदि मान्यवरांच्या उपस्थितित हा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी ज्यांनी ज्यांनी आर्थिक मदत तसेच इतर मदत केली त्यांचा सन्मान केला गेला.
गेली २० ते २२ वर्षे आपण हा घाट बांधण्याच्या मागे होतो. आपल्या सरपंच पदाच्या कार्यकाळात मी अनेकदा प्रयत्न केले हा घाट बांधण्याचे. मात्र काही कारणामुळे ते होऊ शकले नाही. मात्र हा घाट बांधायचाच हा चंग मी बांधला होता. त्यासाठी लोकसहभाग महत्वाचा महत्वाचा होता. शेवटी आज गणेश चतुर्थी दिवशी हा घाट गणेश भक्तांना गणेश विसर्जनसाठी उपलब्ध करून देता आला हा गणेशाचाच आशीर्वाद आहे असे प्रतिपादन बलवंत कुडतरकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात केले. यावेळी ग्राम पुरोहित सुरेश पुराणिक सर, साबाजी ( चंदन ) धुरी आदि मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी मोठ्या प्रमाणात गणेश भक्त उपस्थित होते.
बलवंत कुडतरकर मित्रमंडळाने केलेल्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन पत्रकार रंजित जाधव यांनी केले..