दशावतार म्हणजे कोकणाचा श्वास कोकणाचा ध्यास आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि देवभक्तीचा जिवंत वारसा. ही कला आज जिवंत आहे ती कोणामुळे? तर त्या कलाकारामुळे, ज्याने आयुष्यभर स्वतःच्या सुख-दुःखाचा विचार केला नाही. कित्येक कलाकारांनी घरादारावर, संसारावर अक्षरशः तुळशीपत्र ठेवलं. लेकरांच्या गरजा बाजूला ठेवल्या, बायकोच्या डोळ्यातले अश्रू पुसायला वेळ नव्हता, आई-वडिलांची सेवा राहिली, स्वतःच्या शरीराची पर्वा केली नाही, ताप असो, पाऊस असो, वादळ असो की भूक असो पण रंगमंच कधी सोडला नाही. कारण त्याच्यासाठी दशावतार ही नोकरी नव्हती, ती त्याची पूजा होती, त्याचा धर्म होता, त्याचा श्वास होता. रात्रीभर जागून प्रयोग केले, पहाटे घरी परतले, पुन्हा दुसऱ्या रात्री नव्या जोमाने उभे राहिले. 

लोकांच्या टाळ्यांमध्ये त्यांनी आयुष्य घालवलं, पण त्या टाळ्यांनी त्यांच्या घरात कधी दोन वेळचं सुखाचं जेवण दिलं का? त्यांच्या म्हातारपणाची सोय केली का? त्यांच्या मुलांच्या भविष्याची हमी दिली का? नाही अजिबात नाही. काही कलाकारांनी तर एखाद्या कंपनीला स्वतःच्या रक्ताचं पाणी करून उभं केलं, स्वतःचं तारुण्य, स्वतःची स्वप्नं, स्वतःचं संपूर्ण आयुष्य त्या मंडळाच्या उत्कर्षासाठी अर्पण केलं. कंपनी मोठी झाली, नाव कमावलं, मान मिळवला पण ज्याच्या खांद्यावर उभं राहून हे वैभव मिळालं, तोच कलाकार जेव्हा वयामुळे किंवा आजारपणामुळे अंथरुणाला खिळला, तेव्हा त्याच्या दारात चौकशीला किती जण गेले? ज्याच्यासाठी कधी रात्रभर जागायचे, त्याच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी दोन मिनिटं कोणाकडे नव्हती. आणि जेव्हा त्या कलाकाराने या जगाचा कायमचा निरोप घेतला, तेव्हा त्याच्या अंत्ययात्रेला किती जण खांदा द्यायला उभे राहिले? तेही राहू द्या निदान बाराव्या दिवशी त्याच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी तरी किती जणांनी त्या घराची पायरी चढली? त्या कलाकाराची पत्नी, त्याची लेकरं, त्याचं कुटुंब अश्रूंमध्ये जगत असताना त्यांच्या पाठीवर मायेचा हात ठेवायला किती जण गेले? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारायला हवा. 

सांगा ना त्या कलाकाराला आयुष्यभराच्या त्यागाचं, कष्टाचं, निष्ठेचं आणि प्रामाणिकपणाचं हेच फळ मिळायचं होतं का? आज तोच कलाकार आपल्या हक्कासाठी आवाज उठवतो, एकसंघ होतो, तेव्हा काहींना वाटतं की कलाकार बंड करतोय, दशावतारात मतभेद निर्माण झालेत, कलाकार न्याय मागतोय. पण खरंच तो न्याय मागतोय का? नाही तो कुणाच्या वाट्याचा घास मागत नाही, कुणाचं वैभव हिसकावून घेत नाही, कुणाला कमी लेखत नाही. तो फक्त आपल्या घामाचा हिशोब मागतोय. आयुष्यभर केलेल्या कष्टाचा सन्मान मागतोय. आपल्या हक्काचा अधिकार मागतोय.आज पर्यंत कलाकारांचा नावावर कोट्यवधी निधी आला या निधीपैकी प्रत्यक्षात एका सामान्य कलाकाराच्या हातात किती रुपये पोहोचले कलाकारांच्या नावाने जाहीर झालेला प्रत्येक रुपया कुठे खर्च झाला याचा पारदर्शक हिशोब मागतोय. मालक आपल्या जागी योग्य आहे, रसिक आपल्या जागी योग्य आहे, पण कलाकारही तितकाच योग्य आहे. कारण कलाकाराशिवाय दशावतार नाही. 

रंगमंचाला जीव देणारा कलाकार आहे, पात्रांना आत्मा देणारा कलाकार आहे, देवाची भूमिका साकारताना स्वतःला विसरणारा कलाकार आहे. त्याच्या डोळ्यातलं पाणी कुणाला दिसत नाही, कारण तो रंगमंचावर नेहमी हसत उभा असतो. पण त्या हास्यामागे किती वेदना दडलेल्या असतात, किती अपमान गिळलेले असतात, किती संघर्ष लपलेले असतात, हे फक्त तो कलाकार आणि त्याचं कुटुंबच जाणतं. म्हणून आज कलाकाराची ही लढाई कोणाविरुद्ध नाही, तर आपल्या अस्तित्वासाठी आहे. आपल्या स्वाभिमानासाठी आहे. आपल्या पुढच्या पिढीतील कलाकार जगला पाहिजे म्हणून आहे. कारण कलाकार वाचला तरच दशावतार वाचेल कलाकाराचा सन्मान राहिला तरच ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेलअन्यथा उद्या रंगमंच असेल, पडदा असेल, वेशभूषा असेल, टाळ्यांचा गजरही असेल पण त्या सगळ्याला प्राण* *फुंकणारा कलाकारच उरणार नसेल. आणि त्या दिवशी फक्त एक कलाकार मरणार नाही, तर कोकणाचा श्वास, कोकणाचा ध्यास आणि आपल्या संस्कृतीचा एक जिवंत इतिहास कायमचा हरवून जाईल.

🙏समस्त उपेक्षित कोकणातील दशावतार कलाकार🙏

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!