जिल्हा परिषदेमधील अनागोंदी कारभार, बायोमेट्रिक हजेरी, रस्त्यांवरील खड्डे, महसूल विभागातील सावळा गोंधळ अन् दूषित पाण्याच्या नमुन्यांचा प्रश्न ऐरणीवर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध गंभीर प्रश्न ऐरणीवर असताना आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणाऱ्या कोकण आयुक्तांकडून जिल्हावासीयांना मोठ्या अपेक्षा आहेत. जिल्हा परिषदेमधील अनागोंदी कारभार, अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली, रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे, महसूल विभागातील सावळा गोंधळ, तसेच जिल्हा परिषदेकडून घेण्यात आलेल्या दूषित पाण्याच्या नमुन्यांचा प्रश्न यावर आयुक्त ठोस आढावा घेणार का, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते गुरुदास गवंडे यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना नागरिकांनी विविध प्रश्नांबाबत तब्बल १३५ निवेदने सादर केली होती. या निवेदनांवर आजपर्यंत कोणती कार्यवाही करण्यात आली, किती निवेदने निकाली काढण्यात आली आणि किती प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत, याचा सविस्तर आढावा कोकण आयुक्त घेणार आहेत का, असा प्रश्न गवंडे यांनी उपस्थित केला आहे.
“महसूलमंत्री जिल्ह्यात येतात, नागरिक आपली गाऱ्हाणी मांडतात, १३५ निवेदने देतात; मात्र त्यानंतर त्या निवेदनांचे काय झाले, याचा हिशेब जनतेला मिळणार की नाही?” असा सवाल त्यांनी केला.
जिल्हा परिषद प्रशासनाशी संबंधित विविध प्रश्नांमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी प्रणाली, कार्यालयीन कामकाजातील पारदर्शकता आणि प्रशासनातील अनागोंदी कारभार यांचाही समावेश आहे. या विषयावरही आयुक्तांनी वस्तुस्थिती जाणून घेऊन आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यांच्या निकृष्ट कामांची जबाबदारी निश्चित करून संबंधित ठेकेदारांवर कारवाई झाली का, याचाही आढावा आयुक्तांनी घ्यावा, अशी मागणी गवंडे यांनी केली आहे.
दूषित पाण्याच्या नमुन्यांचा प्रश्न गंभीर
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून विविध ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याचे नमुने घेण्यात येतात. त्यामध्ये दूषित अथवा पिण्यास अयोग्य पाण्याचे नमुने आढळल्यास त्यावर कोणती कार्यवाही झाली? संबंधित गावांना शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी कोणती उपाययोजना करण्यात आली? याचा सविस्तर आढावा घेणे गरजेचे असल्याचे गवंडे यांनी म्हटले आहे.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था, वीजपुरवठा, आरोग्य सुविधा, कायदा-सुव्यवस्था आणि गणेश विसर्जनाचे नियोजन याबाबतही प्रशासनाची तयारी कितपत आहे, याची पाहणी होणे आवश्यक आहे.
“कोकण आयुक्तांचा दौरा केवळ बैठका, पाहणी, मतदार यादी पुनर्निरीक्षण किंवा कागदी अहवालापुरता मर्यादित राहू नये. महसूलमंत्र्यांना देण्यात आलेल्या १३५ निवेदनांवरील कार्यवाही, जिल्हा परिषदेतील अनागोंदी कारभार, दूषित पाण्याचे नमुने, रस्त्यांवरील खड्डे आणि गणेशोत्सवाचे प्रशासकीय नियोजन या सर्व विषयांवर ठोस आढावा घेऊन जबाबदारी निश्चित झाली पाहिजे,” अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गुरुदास गवंडे यांनी केली आहे.
“जनतेने निवेदने द्यायची, अधिकारी बैठका घ्यायच्या आणि प्रश्न मात्र जैसे थे राहायचे, असे यापुढे चालणार नाही. कोकण आयुक्तांनी आजच्या दौऱ्यात जनतेच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीही सुनिश्चित करावी,”विभागिय आयुक्त कोकण अगरवाल याचा आजचा दौरा केवळ घावणे वडेसागोती, सुरमय पापलेट साठी मर्यादित न राहो… अन्यथा असे गवंडे यांनी स्पष्ट केले.