नुकत्याच पार पाडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले होते. यात अपक्ष निवडून आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांची चर्चा खूपच रंगली होती. मुळात हे अपक्ष भाजप पक्षाचे सदस्य होते. मात्र बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवत त्यांनी विजय देखील खेचून आणला होता.मात्र पक्ष शिस्तीचा भंग केल्या कारणाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

मात्र हे निलंबन अखेर मागे घेण्यात आले. भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून हे निलंबन मागे घेण्यात आल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

यामुळे आता चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. निलंबन करण्यात आलेले काही पदाधिकारी हे मित्र पक्ष शिवसेना (शिंदेसेना) आणि स्वपक्षीय भाजप पक्षाच्या उमेदवाराविरोधात लढून विजयी झाले होते. यामुळे स्व पक्षातील पदाधिकारी आणि मित्र पक्ष असलेल्या शिवसेना पक्षातील पदाधिकारी ( शिंदेगट ) यांची नेमकी भूमिका काय असेल हे येत्या काळात स्पष्ट होईलच.

आपला पक्ष वाढला पाहिजे, सत्तेत आपला पक्ष राहिला पाहिजे हे प्रत्येकाला वाटत असते त्यासाठी जो तो प्रयत्न करत असतो. भाजप पक्ष देखील याला अपवाद नाही. मात्र केंद्रात, राज्यात, जिल्ह्यात सत्तेत असलेला भाजप पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्याना विसरत चालला असल्याची भावना यावेळी कुजबुजीने अनेक जुने जाणते कार्यकर्ते आणि पदाधिकारी करताना ऐकायला मिळत आहे. बंडखोरी केलेल्या उमेदवाराविरोधात पक्ष डोळ्यासमोर ठेवून अनेकांनी जीवाचे रान केले होते. केवळ पक्ष निष्ठा म्हणून. मात्र बंडखोरांना पायघडी आणि निष्ठावंताकडे दुर्लक्ष हे चित्र पाहायला मिळत असल्याचे अनेक पदाधिकारी बोलत आहेत.

शेवटी पक्षीय पातळीवर अनेक निर्णय घेताना सर्व विचार करावा लागतो. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी तो नक्कीच केला असेल. मात्र यामुळे युतीत कोणते विघ्न न येता आणि पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जिल्ह्यातील भाजप पक्षाला पुढे जावे लागेल. शेवटी भाजप हा शिस्तीचा पक्ष म्हणून आपली ओळख अधोरेखित करतो आणि ही शिस्त या निर्णयाने पुन्हा एकदा नक्कीच पाहायला मिळेल अशी अपेक्षा करूया..

error: Content is protected !!