सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनींचे नकाशे जीर्ण झाल्यामुळे ते उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या भूमी अभिलेख प्रशासनाच्या विरोधात माजगाव ग्रामस्थांनी आंदोलन छेडले होते. या आंदोलनानंतर प्रशासनाने दोन महिन्यांत नकाशे देण्याचे आश्वासन दिले होते. याच पार्श्वभूमीवर, आज जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी या गंभीर प्रश्नाकडे जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे थेट लक्ष वेधले. विक्रांत सावंत यांच्या या यशस्वी पुढाकारानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने नकाशे देण्याच्या कामाला लागण्याचे कडक आदेश दिले आहेत.

सन २००० मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा वेगळा झाल्यापासून म्हणजेच गेली २४ वर्षे माजगाव येथील शेतकरी नकाशांसाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे पाठपुरावा करत आहेत. नकाशे उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीची हद्द निश्चित करता येत नव्हती, तसेच अवकाळी पाऊस व वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीची शासकीय भरपाई मिळवताना नकाशे नसल्याने प्रस्ताव फेटाळले जात होते. या प्रशासकीय त्रासाला कंटाळून अखेर माजी पंचायत समिती सदस्य श्रीकृष्ण सावंत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडले होते. त्यावेळी तहसीलदार आणि भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करून दोन महिन्यात नव्याने नकाशे देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. प्रशासनाने आश्वासन दिले असले तरी या कामाला गती मिळावी आणि शेतकऱ्यांना तातडीने न्याय मिळावा यासाठी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी आज सावंतवाडी दौऱ्यावर असलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेतली. विक्रांत सावंत यांनी माजगावच्या शेतकऱ्यांच्या नकाशांचा प्रश्न आणि प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची माहिती पालकमंत्र्यांसमोर मांडून या विषयाकडे त्यांचे विशेष लक्ष वेधले.

यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना पाचारण केले. “माजगावच्या शेतकऱ्यांची मागणी अत्यंत रास्त असून, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार नकाशे देण्याचे काम तात्काळ मार्गी लावा,” असे कडक आदेश मंत्री राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!