उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व स्मार्ट प्रकल्पांतर्गत अनमोल प्रभागसंघ तळवडे कार्यक्षेत्रातील ‘भूमिमाता महिला शेतकरी उत्पादक कंपनी लि. मळगाव’ च्या काजू प्रक्रिया युनिट (2 TPD) नवीन इमारतीचा भूमिपूजन सोहळा आज, मंगळवार दि. २१ जुलै २०२६ रोजी नेमळे-पेंडूरकरवाडी (ता. सावंतवाडी) येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कंपनीच्या या नवीन इमारतीमुळे प्रशासकीय कामकाजाला गती मिळणार असून महिला शेतकऱ्यांना सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. या कंपनीसाठी स्मार्ट उपप्रकल्पांतर्गत ५८.४० लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आला असून, त्यात ६० टक्के अनुदान समाविष्ट आहे.
कार्यक्रमाचे भूमिपूजन सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती श्रीम. सुस्मिता जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले. उमेद MSRLM अंतर्गत जिल्ह्यातील हे पहिल्या FPC चे इमारत भूमिपूजन ठरले.
या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हा अभियान व्यवस्थापक कक्षाचे जिल्हा व्यवस्थापक श्री. अभिजित परब यांनी महिला शेतकऱ्यांना संघटित करून शेतीमालाचे मूल्यवर्धन, प्रक्रिया, साठवणूक आणि थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महत्त्व अधोरेखित केले. सभापती सुस्मिता जाधव यांनीही कंपनीच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी आणि उपक्रमासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यास तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष सावंतवाडीच्या बीएमएम (BMM) श्रीम. स्वाती रेडकर, तळवडे प्रभाग समन्वयक सचिन नाईक, भूमिमाता कंपनीच्या अध्यक्षा निकिता बुगडे, सचिव रुपाली गुडेकर, कोषाध्यक्ष मयुरी दळवी यांच्यासह कंपनीच्या संचालक सौ. विशाखा ठाकूर, सौ. रंजना तेली, सौ. दीपाली हरमलकर, सौ. हर्षदा पेडणेकर आणि सौ. मनाली परब उपस्थित होत्या.
याशिवाय स्थानिक ग्रामस्थ, अनमोल प्रभागसंघाच्या सर्व कॅडर आणि कंपनीच्या महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी कंपनीच्या सचिव सौ. रुपाली गुडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
