आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस २० जुलै साजरा करण्यात आला. या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविले गेले.त्यात अजून एक भर पडली आहे.
रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून माझे मित्र उद्योजक पैकाणे हे दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसी येथे १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून डाटा एन्ट्री कंटेनर तयार करण्याचा कारखाना सुरू करत आहेत. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या मित्राने मला दिलेली ही भेट आहे, अशी माहिती माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी दिली. सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी क्रिएटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग सोलुशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक सुनील पैकाणे व संचालक संदीप रेडकर उपस्थित होते.
श्री. केसरकर पुढे म्हणाले, पैकाणे यांनी यापूर्वी २०१० सालामध्ये बांदा-वाफोलीत कंपनी सुरू केली. या कंपनीमध्ये आज ७०० स्थानिक युवक नोकरीला आहेत. या भागातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून आता क्रिएटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन इंडिया प्राइव्हेट लिमिटेड ही कंपनी कंटेनर डाटा एन्ट्री या प्रकल्पाद्वारे शंभर कोटीची गुंतवणूक आडाळी येथील एमआयडीसीमध्ये करत आहे. उद्या मुंबई येथे उद्योग मंत्र्यांशी बैठक आयोजित केली असून यात पैकाणे यांच्या उद्योगाकरिता एमआयडीसीमध्ये ६ एकर जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे आगामी काळात येथील शेकडो तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध होणार आहे. आडाळी एमआयडीसीमध्ये आता दर गुरुवारी एमआयडीसीचे अधिकारी उपलब्ध होणार आहेत. या ठिकाणी जास्तीत जास्त उद्योगधंदे आणून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे, असे श्री. केसरकर सांगितले.
दरम्यान, सुनील पैकाणे म्हणाले, जागा ताब्यात मिळाल्यानंतर सहा ते आठ महिन्यात आम्ही प्रोडक्शनला सुरुवात करणार आहोत. कंपनी सुरू झाल्यावर अनेक युवकांना रोजगार उपलब्ध होईल. किमान दहावी पास व आयटीआय कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. ज्या ज्या ठिकाणी आम्ही कंपनी उभारतो त्या त्या ठिकाणच्या स्थानिक युवकांना आम्ही प्राधान्याने रोजगार देतो. आमचे वाफोली येथे चार कारखाने असून त्या ठिकाणी अजून जागा उपलब्ध झाल्यास येथे आणखी कारखाने उभारण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, दीपक केसरकर यांनी अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण केली. अजित पवारांशी माझे घनिष्ठ संबंध होते. मला एकेरी नावानं हाक मारणारे ते नेते होते. त्यांच्यासोबत अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मला अनेकदा लाभली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही हे नातं पुढे जोपासल आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही वाढदिवस आज असून माझे आणि त्यांचे संबंध चांगले आहेत. एकनाथ शिंदेंप्रमाणेच देवेंद्र फडणवीसांसही माझं नातं घट्ट आहे. मला मंत्रीपद मिळाल नाही त्यावेळी तुम्ही मंत्रीमंडळात असायला हवेत असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस होते. उद्धव ठाकरेंनी राज्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला सांगितलेला तेव्हा सेनेला कॅबिनेट मंत्रीपद देत माझी दोन्ही खाती त्यांनी इतरांकडे जाऊ दिली नाहीत. मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम ते करत असून त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना श्री. केसरकर यांनी केली.
तर, मतदारसंघातील अपूर्ण राहिलेले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल लवकरच पुर्णत्वास येईल, खंडपीठासमोर याबाबतचा निकाल लवकरच लागेल व ते पूर्णत्वास येईल. तर दोडामार्ग हॉस्पिटल पूर्णत्वास येत आहे. वेंगुर्ला, शिरोडा येथे वैद्यकीय अधिकारी देण्यावर भर असून सावंतवाडी येथे बीओटी तत्त्वावर ‘बस पोर्ट’ निर्माण होण्यासाठी परिवहन मंत्र्यांनी ग्वाही दिली आहे. बोट निर्माण करण्याचा कारखाना पालकमंत्री नितेश राणे यांनी मंजूर केला असून त्यांचेही विशेष धन्यवाद आहेत. सिंधुरत्न योजनेतून ते चांगलं काम करत आहेत. तिलारीत एम्युझमेंट पार्क, वॉटर स्पोर्टस आणि ॲनिमल सेंटर निर्माण करू़न देशात दोडामार्गच नाव पोहचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शक्तिपीठ महामार्ग रेडीला जोडण्यासाठीची मागणी केली आहे. तसेच आंबोलीत गोल्फ कोर्स आणि ॲडव्हेंचर स्पोर्ट्स हे माझे ड्रीम प्रोजेक्ट साकारण्यासाठी यापुढील काळात अधिक भर राहणार आहे. सावंतवाडी शहरात पर्यटनात्मक विकासावर भर देत असताना येथे शिर्डी सारख साई मंदिर उभं करण्यासाठी माझा मानस आहे. वडील वसंतशेठ केसरकर यांच्या नावाने चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करून त्या माध्यमातून गरजूंना मदत करण्यासाठी व मंदीर उभारणीचा माझा संकल्प आहे अशी माहिती श्री. केसरकर यांनी दिली.
