शेती, माती आणि नाती” यांचे अनमोल संस्कार बालमनावर रुजावेत, ग्रामीण जीवनाशी विद्यार्थ्यांची नाळ अधिक घट्ट जोडली जावी आणि बळीराजाच्या कष्टांची खरी जाणीव व्हावी या उदात्त हेतूने सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक ५ मध्ये आयोजित करण्यात आलेला ‘बांधावरची शाळा’ हा अभिनव उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष शेतात उतरवून भात शेतीची संपूर्ण प्रक्रिया अनुभवण्याची संधी देण्यात आली. भात लागवडीपूर्वीची शेती मशागत, जमिनीची तयारी, भाताच्या रोपांची लागवड तसेच प्रत्यक्ष भात रोवणी कशी केली जाते, याचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतात काम करताना देण्यात आले.
लाल मातीचा दरवळ, चिखलात राबण्याचा आनंद, हिरव्यागार शेतातील उत्साह आणि बळीराजाच्या अथक परिश्रमांची जाणीव विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली. स्वतः हाताने भाताची रोपं लावताना त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि शेतीविषयी निर्माण झालेली आत्मीयता हा उपक्रमाचा सर्वात मोठा ठेवा ठरला.
या उपक्रमासाठी केंद्रप्रमुख लक्ष्मीकांत ठाकूर आणि मुख्याध्यापक भास्कर माजगावकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच सहाय्यक शिक्षक सुधीर गावडे आणि हंसराज गवळी यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीकामाचे कौशल्य आत्मसात करून देत उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
ग्रामीण संस्कृती, शेतीचे महत्त्व आणि अन्नदात्याच्या कष्टांविषयी विद्यार्थ्यांच्या मनात आदरभाव निर्माण करणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला. या अभिनव उपक्रमाबद्दल शालेय व्यवस्थापन समिती, पालकवर्ग आणि ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळा क्रमांक ५ चे मनःपूर्वक कौतुक करत अभिनंदन केले.
