सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाचा विषय हा रोजगार आहे. इथला युवक हा गोवा, मुंबई, पुणे, नाशिक अश्या ठिकाणी नोकरीसाठी जातो. हे कुठेतरी थांबाव असं मला वाटत होत. विरोधक टिका करतात त्यांना आपण देखील त्याच पद्धतीने उत्तर द्यावं असं वाटत होत. मात्र त्यांची रेषा ही तेवढ्यापूर्ती मर्यादित आहे. मी मात्र माझी रेषा विकास कामे करून,प्रकल्प आणून, इथल्या युवांना रोजगार उपलब्ध करून देऊन नक्कीच वाढवणार, यासाठी मी काहीही करायला तयार आहे असे तळवणे येथे झोया मरीन जहाज बांधणी च्या उदघाटन प्रसंगी आमदार, पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
फडणवीस सरकार मध्ये ज्यावेळी मंत्रिपदाची संधी मिळाली त्यावेळी एवढंच ठरवलं की इथला युवक हा आपल्या जिल्ह्यातच रोजगारासासाठी थांबला पाहिजे. प्रत्येक घरातील किमान दोन व्यक्तीना रोजगार देण्याचा आपला मानस असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
विरोधकांचा आपल्या नेहमीच्या शैलीत समाचार घेताना नितेश राणे म्हणाले की, कोकणात कोणताही प्रकल्प आणायचा झाला की एखाद मांजर कस आडवं येत तसे विरोधक आडवे येतात. पर्यावरणाची हानी होईल असे प्रकल्प आपण जिल्ह्यात होऊ देणार नाही हे मी आधीच बोललो. विरोधक पर्यावरणाची हानी होणाऱ्या प्रकल्पाना विरोध करतात, मात्र पर्यावरण पूरक असे प्रकल्प जेव्हा आमच्या सरकारच्या माध्यमातून आणले जातात तेव्हा शुभेच्छा देखील देत नाहीत. त्यांची ही दुटप्पी भूमिका वेळीच ओळखा. जिल्ह्यात येणारा कोणताही प्रकल्प हा सहज येत नाही त्यासाठी संबंधित व्यक्तींशी, संस्थेशी संवाद साधावा लागतो. कित्येक मीटिंग घेतल्या जातात, तेव्हाच ते आपल्या जिल्ह्यात गुंतवणूक करण्यास तयार होतात. त्यांचा हा विश्वास आपण कोणाच्याही सांगण्याने तोडायचा नाही आहे.
यावेळी माजी आमदार राजन तेली यांनी तळवणे येथे जसा जहाज बांधणीचा प्रकल्प सुरु करण्यात आला त्याचप्रमाणे आरोंदा येथील कित्येक वर्षे बंद असलेली जेटी सुरु करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना सांगितले. यावेळी नितेश राणे यांनी लवकरच आपण ती सुरु करणार असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी तळवणे येथील या पंचक्रोशीतील जनतेला कसा फायदा होणार हे पटवून दिले. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी, नितेश राणे यांनी आपल्या मतदार संघाचा विचार न करता सावंतवाडी विधानसभा मतदार संघाला आपल्या पालकमंत्री कार्यकाळातील पहिलाच प्रकल्प दिला याबद्दल विशेष आभार मानले.तर या प्रकल्पाच्या माध्यमातून २०० जहाजांची बांधणी करण्यात येणार आहे तसेच इथल्या तरुणांना रोजगार मिळावा यासाठी त्यांना या प्रकल्पा संदर्भातील तांत्रिक बाबींची माहिती देऊन त्यांना ट्रेनिंग दिल जाणार आहे अशी माहिती झोया मरीन प्राव्हेट लिमिटेड चे जॉन फर्नांडिस यांनी दिली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी आमदार राजन तेली, झोया मरीनचे संचालक जॉन फर्नांडिस, सुरज देवारीया, डॉ. निलेश बाणवलीकर, युवराज लखमराजे भोंसले, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक,जिल्हा परिषद सदस्या अपर्णा सातोसकर, माजी जिल्हा परिषद सदस्या शर्वाणी गावकर, माजी उप सभापती संदीप नेमळेकर, पंचायत समिती सदस्या स्नेहा कांबळे, तळवणे सरपंच गोविंद केरकर, उबाठा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, शेखर गावकर, सिद्धेश कांबळी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी, तळवणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.