नगरपालिकेच्या माध्यमातून तब्बल ५७ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या नळपाणी योजनेचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. हे काम काही दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता असली, तरी नव्या योजनेचे योग्य पद्धतीने टेस्टिंग होऊन शहरातील सर्व नागरिकांना नियमित पाणीपुरवठा सुरू होईपर्यंत जुनी जलवाहिनी बंद करू नये, अशी मागणी माजी नगरसेवक विलास जाधव यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे. यात असे म्हटले आहे की, पूर्वीची संस्थानकालीन जलवाहिनी ग्रॅव्हिटी तत्त्वावर कार्यरत होती. मात्र, नव्याने उभारण्यात येणाऱ्या नळपाणी योजनेची जलवाहिनी रस्त्याच्या बाजूने टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीला अनेक ठिकाणी जोड देण्यात आले आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर पाण्याचा दाब सहन न झाल्यास जलवाहिनी फुटण्याची शक्यता आहे. परिणामी नागरिकांना पाणीपुरवठ्यापासून वंचित राहावे लागू शकते, अशी भीती जाधव यांनी व्यक्त केली आहे.

नव्या योजनेचे संपूर्ण टेस्टिंग करून ती व्यवस्थित कार्यरत असल्याची खात्री झाल्यानंतरच जुनी जलवाहिनी बंद करण्याचा निर्णय घ्यावा. तोपर्यंत जुनी जलवाहिनी सुरू ठेवून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशी मागणी विलास जाधव यांनी केली आहे.

error: Content is protected !!