बुद्धिबळाच्या पटावर एकाचवेळी शेकडो खेळाडूंना आव्हान देत, प्रत्येक पटावरील डावावर लक्ष ठेवत बुद्धिबळाचा थरार निर्माण करणारे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू आणि चेस चॅलेंजर अकॅडमीचे संस्थापक शरद वझे आज १ ऑक्टोबर रोजी यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसोबत बुद्धिबळ खेळणार आहेत. सकाळी १० वाजता या अनोख्या उपक्रमाला सुरुवात होणार असून सायंकाळपर्यंत हा बुद्धिबळाचा विशेष उपक्रम सुरू राहणार आहे.
एकाच वेळी अनेक खेळाडूंसोबत एकटे बुद्धिबळ खेळण्याच्या ‘सायमल्टेनियस चेस प्ले’ या वैशिष्ट्यपूर्ण प्रकारासाठी शरद वझे विशेष ओळखले जातात. बुद्धिबळाचा प्रसार, विद्यार्थ्यांमध्ये या खेळाची आवड निर्माण करणे आणि बुद्धिबळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देणे, या उद्देशाने त्यांनी देशभरात विविध शाळा व संस्थांमध्ये असे उपक्रम राबविले आहेत.
विश्वनाथ आनंद यांनी २००७ मध्ये बुद्धिबळाचे विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर बुद्धिबळाच्या प्रसारासाठी शरद वझे यांनी १ मे २००८ पासून ‘बुद्धिबळ प्रज्ञा शोध’ हा उपक्रम सुरू केला. या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रासह भारतातील विविध राज्यांमध्ये हजारो विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसोबत बुद्धिबळाचे सामने खेळले आहेत. आतापर्यंत आठ राज्यांमधील अनेक संस्थांतील दहा हजारांहून अधिक खेळाडूंशी त्यांनी सायमल्टेनियस बुद्धिबळ सामने खेळल्याची नोंद आहे. या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे त्यांचा सुपरफास्ट बुद्धिबळाचा वेग. एका तासात सुमारे २० खेळाडूंसोबत सामने खेळत ते सलग अनेक तास शेकडो खेळाडूंशी बुद्धिबळ खेळतात. प्रत्येक पटावरील डाव लक्षात ठेवून पुढील पटाकडे जाणे, प्रतिस्पर्ध्याच्या चालीचा अंदाज घेणे आणि त्याचवेळी संपूर्ण खेळाचे समालोचन करणे हे त्यांच्या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे.
या उपक्रमात शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ बुद्धिबळाचा सामना खेळण्याचीच नव्हे, तर एका अनुभवी बुद्धिबळपटूकडून डावपेच, रणनीती, एकाग्रता आणि निर्णयक्षमता यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. बुद्धिबळाचा हा अनोखा उपक्रम सायंकाळपर्यंत रंगणार असून शाळेच्या नालंदा सभागृहात दिवसभर बुद्धिबळाच्या चाली, रणनीती आणि विद्यार्थ्यांचा उत्साह पाहायला मिळणार आहे.