दिनांक २०/१२/२०२० रोजी १५.४५ ते १५.५० वा. चे दरम्यान राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे कर्मचारी सावंतवाडी ते बांदा अशी पेट्रोलिंग करीत असताना दुपारी इन्सुली खामदेव नाका येथे थांबलेले होते. त्यांच्यासोबतचे दुसरे स्कॉड हे बांदा येथे पेट्रोलिंग करीत असताना सदर ठिकाणी त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, स्कॉर्पिओ नं. MH 07-AG-0216 व बलेनो गाडी नं. MH 07-AG-9006 या गाड्यांमध्ये दारू असून सदर गाड्या दारू भरून सावंतवाडी येथे जाणार आहेत.
म्हणून ते आपल्या सहकाऱ्यांसोबत वॉच करीत इन्सुली मार्गे सावंतवाडीकडे जाणाऱ्या रोडवर थांबलेले होते. १५.३० वा. दरम्यान वरील दोन्ही क्रमांकांच्या गाड्या या खामदेव नाका पाठिमागण आल्या व त्या वेगाने सावंतवाडीच्या दिशेने जाण्यासाठी निघाल्या. म्हणून दुय्यम निरीक्षक श्री. जरांडे यांनी त्यांना थांबवण्याचा इशारा केला.
कुडाळ ते सावंतवाडी असे राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे कर्मचारी हे पेट्रोलिंग करीत असल्याचे श्री. जरांडे यांना माहिती असल्याने श्री. जरांडे यांनी राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक यांना फोन करून वरील नमूद नंबरच्या गाड्यांमध्ये दारू भरलेली असून त्या दोन्ही गाड्या सावंतवाडीच्या दिशेने जात असून तुम्ही त्या दोन्ही गाड्या अडवा, आम्ही त्या दोन्ही गाड्यांचा पाठलाग करीत त्यांचे मागे येत आहोत असे सांगितले.
असे असताना त्यातील गाडी नं. MH 07-AG-0216 हिने सदर ठिकाणी थांबलेल्या राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची सुमो गाडी नं. MH-10-N-0757 या गाडीला समोरील डाव्या बाजूला हेडलाईट जवळ धडक देऊन ती गाडी वेगात निघून गेली. व तिचे पाठोपाठ येत असलेली गाडी नं. MH 07-AG-9006 या गाडीला राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे कर्मचारी यांनी हात केला असता ती गाडी पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असता राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाच्या सुमो गाडीच्या ड्रायव्हरने ती गाडी थांबविण्यासाठी त्या गाडीच्या समोर आपली गाडी आडवी घातली. त्यावेळी बलेनो गाडी थांबली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे प्रमुख श्री. पांडुरंग रंगराव पाटील हे बलेनो गाडीच्या जवळ जाऊन ड्रायव्हरच्या बाजूला बसलेल्या इसमाजवळील दरवाजा उघडून त्यास खाली घेत असताना त्यांना ढकलून देऊन गाडीचा दरवाजा ओढून घेऊन ते वेगात सावंतवाडीच्या दिशेने निघून गेले.
म्हणून आरोपी नं. १ तुषार विनायक तुळसकर, २ विठ्ठल संतोष चौगुले , ३ सालीम निसार नदाफ, ४ अजय सूर्यकांत कवठणकर यांच्याविरुद्ध भारतीय कलम ३५३, १८६, ३४ अन्वये बांदा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरिल प्रकरण ओरस येथील मे. जिल्हा व सत्र न्यायालयात चालून एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले. वरील साक्षीदारांचा आरोपींचे वकील अॅड. परशुराम बाबुराव चव्हाण यांनी घेतलेला उलटतपास व सदरिल प्रकरणी केलेला अंतिम युक्तिवाद तसेच सादर केलेले मा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे ग्राह्य मानून ओरस येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेबांनी संशयित आरोपी क्र. १ ते ४ यांची निर्दोष मुक्तता केली.
आरोपी तर्फे विधिज्ञ अॅड. परशुराम बाबुराव चव्हाण व अॅड. शुभेश सुरेश वंजीवाले यांनी काम पाहिले.