भारतीय संस्कृतीत गोमातेला असलेले अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करणारा वसुबारस सण वेंगुर्ला तालुक्यातील विविध गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने अनेक ठिकाणी गोमातेचे विधिवत पूजन व औक्षण करून तिला गोडधोड खाऊ घालण्यात आले. गोमातेप्रती आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करीत नागरिकांनी भारतीय संस्कृतीतील परंपरेचे जतन केले.
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी वसुबारसच्या निमित्ताने प्रत्येकाने गोमातेचे पूजन करून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महाराष्ट्र शासनाने ३० सप्टेंबर २०२४ रोजी देशी गाईला ‘गोमाता-राज्यमाता’ असा दर्जा दिला आहे. या पार्श्वभूमीवर वसुबारसच्या निमित्ताने गोमातेचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. शेती, दुग्धव्यवसाय, सेंद्रिय खतनिर्मिती तसेच पर्यावरण संवर्धनामध्ये गोवंशाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. मात्र, बदलत्या जीवनशैलीमुळे गोपालनाची परंपरा कमी होत असल्याने देशी गोवंशाचे संवर्धन ही काळाची गरज बनली आहे.
गोमातेचे पूजन केवळ सणापुरते मर्यादित न ठेवता तिचे संगोपन, गोपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन आणि देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. वसुबारसच्या निमित्ताने तालुक्यात विविध ठिकाणी झालेल्या पूजनातून गोमातेप्रती कृतज्ञता आणि गोसंवर्धनाचा सकारात्मक संदेश देण्यात आला.