कोलगाव निरूखे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सतावणारी विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या अखेर निकाली निघाली आहे. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापन आणि ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळत, विद्यमान आमदार व माजी मंत्री मा. श्री.दीपकभाई केसरकर आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष संजु परब यांच्या माध्यमातून शाळेच्या विहिरीसाठी भरीव निधी मंजूर करून आणला आहे. याबद्दल कोलगाव शिवसेना शाखाप्रमुख श्री. गौरव आनंद कुडाळकर यांनी मा. आमदार श्री. दीपकभाई केसरकर आणि जिल्हाध्यक्ष संजु परब यांचे विशेष आभार मानले आहेत.
विद्यार्थ्यांची अडचण झाली दूर
या शाळेत पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध नसल्याने लहान विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या स्थानिक ग्रामस्थांनी व शाळा प्रशासनाने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या कानावर घातली होती. त्यावेळी विद्यार्थ्यांना मुबलक पाणी मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असा शब्द शिवसेनेच्या वतीने देण्यात आला होता.
आमदार श्री.दीपकभाई केसरकर साहेब आणि संजु परब साहेब यांनी या मागणीची तात्काळ दखल घेत निधी मंजूर केल्यामुळे आता विद्यार्थ्यांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. यामुळे संपूर्ण गावात, पालक आणि शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
सामूहिक प्रयत्नांना यश
हा निधी मंजूर करून आणण्यासाठी आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेना उप तालुका प्रमुख राकेश पवार, पंचायत समिती सदस्य प्रणाली टिळवे, रोहित नाईक, आशिका सावंत यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विशेष पाठपुरावा केला होता.
“केसरकर साहेब आणि संजु परब यांच्या खंबीर नेतृत्वामुळेच आज आम्ही ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण करू शकलो आहोत. भविष्यातही त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील लोकहितैषी व शैक्षणिक विकासकामे करण्यासाठी शिवसेना सदैव तत्पर राहील,” असा विश्वास *शाखाप्रमुख गौरव आनंद कुडाळकर* यांनी व्यक्त केला.