कोलगाव आयटीआय परिसरात अधिकृत बस थांबा असतानाही अनेक एसटी बसेस तेथे थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना दररोज तब्बल दोन ते अडीच किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. विद्यार्थ्यांची ही गैरसोय तातडीने दूर करून या बस थांब्यावर सर्व एसटी बसेस थांबवण्यात याव्यात, अशी मागणी जिल्हा रोजगार मेळावा समितीचे सदस्य अमोल टेंबकर यांनी सावंतवाडी बस स्थानक प्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कुडाळ, माणगावसह परिसरातील विविध गावांमधून अनेक विद्यार्थी दररोज कोलगाव आयटीआयमध्ये शिक्षणासाठी येतात. मात्र अधिकृत बस थांबा असूनही एसटी बसेस तेथे थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना पायी प्रवास करावा लागत आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांनी ही समस्या अमोल टेंबकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी आगारप्रमुखांकडे ही मागणी केली असून संबंधित एसटी चालकांना कोलगाव आयटीआय बस थांब्यावर बसेस थांबवण्याच्या सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, जुन्या मुंबई-गोवा महामार्गावरील वाहनांचा वेग लक्षात घेता आयटीआयसमोर अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी तातडीने रंबलर स्ट्रिप बसवाव्यात तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वाहनचालकांना सावध करणारे फलक लावावेत, अशी मागणीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे.

याशिवाय कोलगाव आयटीआयमधील स्वच्छतागृहांची झालेली दुरवस्था दूर करून त्यांची तातडीने साफसफाई व डागडुजी करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन संबंधित विभागांनी या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे

error: Content is protected !!