रक्तदान हेच श्रेष्ठ दान, या सामाजिक भावनेतून तळकट येथे आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ३५ जणांनी सहभाग नोंदवला, तर २६ जणांनी प्रत्यक्ष रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. विशेष म्हणजे, एका महिला भगिनीनेही रक्तदान करून महिलांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला. सातत्याने रक्तदान करणारे गोविंद देसाई (१५ वेळा रक्तदान) आणि गोविंद गवस (९ वेळा रक्तदान) यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
श्री अष्टविनायक मित्रमंडळ तळकट, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा दोडामार्ग, तळकट ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र तळकट व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराला जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष तथा गोवा समन्वयक संजय पिळणकर, दोडामार्ग तालुकाध्यक्ष भूषण सावंत, डॉ.राणे, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी रक्तपेढीचे डॉ. कुनालवार, रेडकर, बागेवाडी, रविना, श्री. कांबळे, गोविंद गवस, रमेश शिंदे, उपसरपंच रमाकांत गवस, माजी शिक्षक दुर्गाराम गवस, शिवप्रसाद नाटेकर, संदीप वेटे, तात्या बांदेकर, प्रज्योत देसाई, दत्तप्रसाद सावंत, ग्रामपंचायत सदस्य विवेक मळीक, अमोल मळीक, माजी सरपंच एम. डी. धुरी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. राणे यांनी ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. ग्रामीण भागात प्रगत सुविधांनी युक्त रुग्णवाहिका उपलब्ध असणे ही काळाची गरज आहे. दोडामार्ग तालुक्यात अशा ॲडव्हान्स रुग्णवाहिकेची नितांत आवश्यकता असून, आरोग्याच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अनेकदा रुग्णांची गैरसोय होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष तथा गोवा समन्वयक संजय पिळणकर यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, रक्त हे मर्यादित कालावधीसाठीच साठवता येते. रक्ताचा साठवण कालावधी साधारणतः ३५ ते ४२ दिवसांचा असल्याने नियमित रक्तदान होणे आवश्यक आहे. थॅलेसेमिया रुग्णांना रक्तपुरवठा करण्यासाठी प्रतिष्ठान सातत्याने कार्यरत आहे. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदानाची ही चळवळ केवळ शहरांपुरती मर्यादित न राहता गावागावांत पोहोचली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सरपंच सुरेंद्र सावंत-भोसले यांनी युवकांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल घडविण्याची गरज व्यक्त केली. रक्तदानाबाबत समाजात अजूनही अनेक गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी व्यापक जनजागृती होणे आवश्यक असून, युवकांनी या सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
भाजपा तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस यांनी तळकट गावातील रक्तदान उपक्रमाचे कौतुक केले. तळकट गावातून ५१ रक्तदाते तयार होणे ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. रक्ताची गरज निर्माण झाल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा नियमित रक्तदानाची सवय समाजात रुजणे आवश्यक आहे. याबाबत गावपातळीवर विचारविनिमय करून जनजागृती केली जाईल. सरपंच सुरेंद्र सावंत-भोसले हे आपल्या कामातून गावाच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर असतात. आगामी काळात तळकट येथे भाजपाच्या वतीनेही रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
**रक्तदानातून माणुसकीचा जागर!**
तळकटमधील या रक्तदान शिबिराने सामाजिक एकजुटीचा आणि माणुसकीचा सुंदर संदेश दिला. रक्तदान ही केवळ एका दिवसापुरती मोहीम न राहता ती प्रत्येक गावाची सामाजिक चळवळ बनली पाहिजे, हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन माजी सरपंच एम. डी. धुरी यांनी केले