दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात जंगली हत्तींचा उपद्रव वाढला असून महिनाभरात हत्ती हटाव मोहीम न राबवल्यास शिवसेनेच्या वतीने उग्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला. या संदर्भात सावंतवाडी मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांनी सावंतवाडीचे उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांची वनविभाग कार्यालयात भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना वैभव नाईक यांनी सांगितले की, गेल्या तीन-चार वर्षांपासून या भागात हत्ती धुमाकूळ घालत आहेत. सत्ताधारी नेते केवळ हत्ती हटाव मोहीम राबवण्याची आश्वासने देत आहेत. उपवनसंरक्षकांकडे विचारणा केली असता या मोहिमेला न्यायालयाने स्थगिती दिल्याचे सांगण्यात आले. मात्र ही न्यायालयीन स्थगिती उठवण्यासाठी सत्ताधारी किंवा वनविभागाने कोणतेही ठोस प्रयत्न केलेले नाहीत. मोर्ले येथे ओंकार हत्तीने एका शेतकऱ्याचा बळी घेतल्यानंतर त्याला महिन्याभरात पकडण्याचे आदेश दिले गेले होते, मात्र दीड वर्ष उलटूनही काहीच कारवाई झालेली नाही.
सध्या हे हत्ती शेतीचे प्रचंड नुकसान करत असून थेट लोकवस्तीत येत असल्याने पुन्हा मनुष्यहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वी माणगाव खोऱ्यात अशाच प्रकारे यशस्वी हत्ती हटाव मोहीम राबवण्यात आली होती, याची आठवण करून देत येत्या महिनाभरात कायदेशीर अडथळे दूर करून मोहीम सुरू न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच हत्तींच्या त्रासाविरोधात दोडामार्ग तालुक्यातील पाळये ग्रामस्थांनी पुकारलेल्या उपोषणाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या शिष्टमंडळात सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, विधानसभा संघटक बाळा गावडे, दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, सावंतवाडी तालुकाप्रमुख राजेश शेटकर, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, कुडाळ उपतालुकाप्रमुख बाळा पावसकर, दोडामार्ग शहरप्रमुख चंदन गावकर, सुशील चिंदरकर, मदन राणे, संदेश राणे, प्रदीप सावंत आणि सिद्धेश राणे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.