भक्तिरसाचा अविष्कार, संतवाङ्मयाचा जागर, सुरेल स्वरांची बरसात आणि तालवाद्यांच्या निनादात श्री देव दाडोबा देवस्थान व ग्रामस्थ मंडळ, दांडेली यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. जिल्ह्यातील नामवंत भजन मंडळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत आपल्या गायन, वादन आणि सांघिक सादरीकरणातून भजन कलेचा दर्जेदार आविष्कार घडविला. भजनप्रेमी, भजनी कलावंत आणि रसिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे या स्पर्धेला विशेष रंगत प्राप्त झाली.

या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत चिंतामणी प्रसादिक भजन मंडळ, सुरंगपाणी-वेंगुर्ले यांनी आपल्या प्रभावी सांघिक सादरीकरणाची छाप उमटवत प्रथम क्रमांकाचा मान पटकावला. सद्गुरू प्रसादिक भजन मंडळ, अणसुर-वेंगुर्ले यांनी द्वितीय क्रमांक, तर समाधी पुरुष भजन मंडळ, मळगाव-सावंतवाडी यांनी तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले तर या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकांमध्ये उत्कृष्ट गायक म्हणून अक्षय कांबळे (देवी भद्रकाली भजन मंडळ, शेर्ले), उत्कृष्ट हार्मोनियम वादक म्हणून अद्वैत पालव (गुरुकुल भजन मंडळ, कुडाळ), उत्कृष्ट पखवाज वादक म्हणून राहुल पांगम (चिंतामणी प्रसादिक भजन मंडळ, वेंगुर्ले), तर उत्कृष्ट तबलावादक म्हणून अमन सातार्डेकर (लक्ष्मीनारायण प्रसादिक भजन मंडळ) यांनी विशेष पारितोषिके मिळवली उत्कृष्ट झांज वादक म्हणून शिवराम सावंत (देव ईसोटी प्रसादिक भजन मंडळ, मातोंड), उत्कृष्ट कोरस म्हणून साई खोडदेश्वर प्रसादिक भजन मंडळ, पिंगुळी, उत्कृष्ट गजर म्हणून समाधी पुरुष भजन मंडळ, मळगाव, तर शिस्तबद्ध संघ म्हणून देव ईसोटी प्रसादिक भजन मंडळ, मातोंड यांची निवड करण्यात आली.

या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळसाठी प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुप्रसिद्ध उद्योजक दत्ता सामंत, शरद धाऊसकर (पंचायत समिती सदस्य, सावंतवाडी), नारायण ऊर्फ बाळा मोरजकर (माजी सरपंच, दांडेली), योगेश नाईक (माजी सरपंच, दांडेली), निलेश आरोलकर (माजी सरपंच, दांडेली), सिद्धेश मालवणकर, संदीप माणगावकर (सामाजिक कार्यकर्ते, दांडेली), राजन मोरजकर, कृष्णा ऊर्फ दादा पालयेकर (माजी सरपंच, दांडेली), दुर्गेश मोरजकर (सामाजिक कार्यकर्ते, दांडेली), नामदेव मोरजकर, प्रमोद ऊर्फ बाळा पांगम, स्वप्नील पांगम आणि रुपेश मोरजकर (बूथ अध्यक्ष, भाजप, दांडेली) आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या संपूर्ण भजन स्पर्धेचे बहारदार, ओघवते आणि अभ्यासपूर्ण निवेदन बाबराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि लोककला अभ्यासक प्रा. वैभव खानोलकर केले तर सहनिवेदक म्हणून अमित परब यांनी काम पाहिले.

आजच्या बदलत्या काळात पारंपरिक भजन कलेला व्यासपीठ उपलब्ध करून देणे, नव्या पिढीमध्ये भजनाची आवड निर्माण करणे आणि अनुभवी भजनी कलावंतांच्या कलेचा सन्मान करणे ही काळाची गरज आहे. दांडेली येथे आयोजित या जिल्हास्तरीय स्पर्धेने ही सांस्कृतिक जबाबदारी समर्थपणे पार पाडली अशी भावना यावेळी दत्ता सामंत यांनी व्यक्त केली.या स्पर्धेचे परीक्षण बुवा दिप्तेश मेस्त्री आणि भावेश राणे यांनी केले

श्री देव दाडोबा देवस्थान व ग्रामस्थ मंडळ, दांडेली यांच्या या स्तुत्य सांस्कृतिक उपक्रमाचे भजनप्रेमी आणि कलारसिकांकडून विशेष कौतुक होत आहे.

error: Content is protected !!