शासन दरबारी तब्बल तीन वेळा रस्त्यासाठी १४ लाखांचा निधी खर्ची पडला, मात्र प्रत्यक्षात रस्त्याचा मागमूसही नाही! असा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार काळसेवाडी भंडारवाडी ते धनगरवाडी जोडणाऱ्या रस्त्याच्या बाबतीत उघडकीस आला आहे. गेली १४ वर्षांहून अधिक काळ आंदोलने आणि उपोषणे करूनही न्याय न मिळाल्याने हवालदिल झालेल्या धनगरवाडीतील ग्रामस्थांनी आता रस्त्याचे काम तातडीने मार्गी न लागल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

भंडारवाडी-धनगरवाडीकडे जाणारा हा मार्ग क्रमांक २६ वर नोंद असलेला अधिकृत रस्ता आहे. मात्र, प्रत्यक्षात हा रस्ता अस्तित्त्वातच नसल्याने ग्रामस्थांचे हाल सुरू आहेत. आपत्कालीन किंवा आजारपणाच्या वेळी रुग्णांना मुख्य रस्त्यापर्यंत आणण्यासाठी लाकडी डोलीचा आधार घ्यावा लागतो. दुसरीकडे, शाळकरी चिमुकल्यांना दररोज चिखल-मातीतून सुमारे दीड किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही या वाडीतील जनतेला मूलभूत रस्त्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे विदारक चित्र आहे.

तब्बल १२ हून अधिक घरांसाठी वापरला जाणाऱ्या या रस्त्यासाठी ग्रामस्थ सुनील वरक हे गेल्या १४ वर्षांपासून सातत्याने लढा देत आहेत. जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांचा जनता दरबार मानवाधिकार आणि थेट विभागीय आयुक्तांपर्यंत वारंवार तक्रारी करूनही या समस्येकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. कागदोपत्री तीन वेळा निधी खर्ची दाखवून रस्ता गायब कसा झाला, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.

दरम्यान या प्रकरणी ग्रामसेवक अर्पिता शेळके यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित जमीन मालक आणि धनगरवाडीतील ग्रामस्थ यांच्यातील जमिनीच्या वादामुळे रस्त्याचे काम रेंगाळले आहे त्या ठिकाणी शासन दरबारी ही नोंद असली तरी तशा प्रकारची कुठची कागदपत्रे अस्तित्वात नाहीत त्यामुळे अनेक अडचणी येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, शासन दरबारी रस्ता म्हणून अधिकृत नोंद असताना प्रशासनाने सामोपचाराने किंवा कायदेशीर मार्ग काढून हा प्रश्न तातडीने सोडवणे आवश्यक होते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

वारंवार चकरा मारूनही शासकीय यंत्रणा दाद देत नसल्याने धनगरवाडीकरांनी संपर्क साधून आपली व्यथा मांडली. तसेच जिल्हा परिषद सदस्य आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय संदीप गावडे यांच्या कानावरही हा गंभीर प्रकार घातला आहे. सत्ताधारी आणि लोकप्रतिनिधींनी या प्रकरणात थेट लक्ष घालून निधीच्या गैरव्यवहाराची चौकशी करावी आणि रखडलेला रस्ता तात्काळ पूर्ण करून धनगर बांधवांना न्याय मिळवून द्यावा, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे.

error: Content is protected !!