*सह्याद्री* अर्थात पश्चिम घाट हा दक्षिण भारताचा जलस्रोत, जैवविविधतेने समृध्द असा हा प्रदेश. दुर्मिळ अशा पशु, पक्षी, प्राणी आणि वनस्पतींचा इथे अधिवास. निसर्गाला इजा होणार नाही असा गरजेपुरता माफक हस्तक्षेप करीत इथला माणूस पिढ्यानपिढ्या निसर्गाला सांभाळत जगत आला. स्वतःची अशी वेगळी निसर्गपुरक जीवनशैली त्याने जन्माला घातली. निसर्गाला उध्वस्त करणारे पंप स्टोरेज प्रकल्प, शक्तीपीठ महामार्ग यासारखे अनेक प्रकल्प सह्याद्रीच्या बोकांडीवर बसवून इथले पर्यावरण आणि मानवी जीवन नष्ट करण्याचा जणू सरकारने विडाच उचलला आहे. इथले पर्यावरण आणि मानवी जीवन उध्वस्त करीत असताना सह्याद्रीच्या साक्षीने जन्माला आलेला छत्रपती शिवाजी राजांचा दैदिप्यमान इतिहासही पुसला जाणार आहे. म्हणूनच *’सह्याद्रीच्या रक्षणासाठी-पारगड ते रायगड जागरण यात्रा’* अशी यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक राजकीय कार्यकर्ते, पर्यावरण प्रेमी, लेखक कवी साहित्यिक कवींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन या मोहिमेचे निमंत्रक कॉ संपत देसाई व राजेंद्र कांबळे यांनी दिली.

 

*भीमाशंकर, तारळी* पाठोपाठ आता *कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ५ पंप स्टोरेज प्रकल्प* उभे केले जाणार असून दीड ते दोन हजार हेक्टर इतके समृध्द जंगल उध्वस्त केले जाणार आहे. याविरोधात जन जागरण करण्यासाठी या यात्रेचा पहिला टप्पा पारगड ते पन्हाळगड असा होणार आहे.

 

या यात्रेचा *पहिला टप्पा पारगड ते पन्हाळगड* असा असणार आहे. या यात्रेची सुरवात पोर्तुगीजांच्यावर नजर ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी राजांनी बांधलेल्या पारगड (ता चंदगड जि कोल्हापूर ) या गडावरून ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होईल. तिथून ही यात्रा हेरे मार्गे चंदगड येथे येईल सभा होईल. धामापूर कुरणी, सभा व जेवण करून आजरा येथे मुक्कामी येईल. व तेथे सभा होईल.

 

दुसऱ्या दिवशी दि १ डिसेंबर रोजी ही यात्रा पेरणोली, देवकांडगाव, पाटगाव कडगाव येथे येईल. तिथे सभा होईल. पुढे शेळोली, मडुर हुन गारगोटी येथे येईल. तिथे पण सभा होईल.

 

तिसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार दि २ डिसेंबर रोजी ही यात्रा मुदाळ तिठ्ठा, सरवडे, शिरगाव, राशिवडे, सडोलीहून पन्हाळा येथे येईल. तिथे पहिल्या टप्प्याची सांगता सभा सायंकाळी ठीक ५.०० वाजता होईल.

सह्याद्री वाचवा मोहीमअंतर्गत होणाऱ्या रायगड ते पारगड यात्रेत आ. सतेज पाटील, माजी खा.राजू शेट्टी, डॉ.भारत पाटणकर, जेष्ठ लेखक राजन गवस, कृष्णात खोत, कॉ उदय नारकर, कॉ सुभाष लांडे, श्रीपाद धर्माधिकारी, यांच्यासह राज्यभरातून सामाजिक राजकीय कार्यकर्ते, लेखक कवी साहित्यिक सहभागी होणार आहेत. आपला सह्याद्री वाचवण्यासाठी निघणाऱ्या या यात्रेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांनी मोठ्या संख्यने सहभागी होण्याचे आवाहन या मोहिमेचे निमंत्रक कॉ संपत देसाई, राजेंद्र कांबळे ( 9420854450)यांनी केले आहे.

error: Content is protected !!