येथील नगरपरिषदेतर्फे महिला व युवतींसाठी आयोजित करण्यात आलेल्या कॅटरिंग कुकींग, अ‍ॅडव्हान्स फॅशन डिझायनिंग, टू-व्हीलर व फोर-व्हीलर ड्रायव्हिंग तसेच ज्युदो-कराटे आदी व्यवसायिक व रोजगाराभिमुख प्रशिक्षण वर्गांचा लाभ शहरातील युवकांनाही देण्यात यावा, अशी मागणी जिल्हास्तरीय रोजगार मेळावा समिती सदस्य अमोल टेंबकर यांनी नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोसले यांच्याकडे केली आहे.

युवकांनाही अशा प्रशिक्षणाची संधी मिळाल्यास त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या दृष्टीने भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले. याबाबत आपण सकारात्मक विचार करू, असे आश्वासन नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांनी दिले.

सावंतवाडी नगरपरिषद महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने शहरातील १८ ते ४५ वयोगटातील महिला व युवतींच्या सक्षमीकरणासाठी विविध रोजगाराभिमुख प्रशिक्षण वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाचे स्वागत करताना श्री टेंबकर यांनी शहरातील युवकांनाही या प्रशिक्षणाचा लाभ मिळावा, अशी मागणी केली. कॅटरिंग, फॅशन डिझायनिंग, ड्रायव्हिंग, संगणक प्रशिक्षण यांसारखी कौशल्ये आत्मसात केल्यास युवकांना नोकरीसोबतच स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.

यापूर्वी काही वर्षांपूर्वी सावंतवाडी शहरातील दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी अशाच प्रकारचे विविध व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविण्यात आले होते. त्यामध्ये एमएससीआयटीसारख्या संगणक प्रशिक्षणाचाही समावेश होता. या प्रशिक्षणाचा अनेक विद्यार्थ्यांना पुढील काळात रोजगार व शिक्षणाच्या दृष्टीने फायदा झाला. त्यामुळे अशा प्रकारचे प्रशिक्षण पुन्हा व्यापक स्वरूपात सुरू करण्याबाबत नगरपरिषद पदाधिकाऱ्यांनी विचार करावा, अशी मागणी टेंबकर यांनी केली.

नगरपरिषदेच्या विद्यमान प्रशिक्षण योजनेत युवकांचाही समावेश करण्यासाठी आवश्यक तो ठराव घेऊन त्यामध्ये बदल करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. याबाबत नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांनी सकारात्मक विचार करून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

error: Content is protected !!