महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या माध्यमातून वकिलांचे प्रश्न सोडवण, कनिष्ठ न्यायालयांमधील पायाभूत सुविधांचा विकास करण आणि नवोदित वकिलांना न्याय मिळवून देण या कामांना माझ सर्वोच्च प्राधान्य राहील अशी ग्वाही दुसऱ्यांदा महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या निवडणुकीत निवडून आलेले ऍड. संग्राम देसाई यांनी दिली. कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल या विधी क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि अटीतटीच्या निवडणुकीत सिंधुदुर्गचे सुपुत्र अ‍ॅड. संग्राम देसाई यांनी प्रस्थापित व दिग्गज उमेदवारांना लढा देत ‘टॉप टेन’मध्ये सहाव्या क्रमांकाची सर्वाधिक पसंतीची मते मिळवून ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. या दैदिप्यमान यशामुळे सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, कुडाळ येथील ‘लाईम लाईट’ हॉटेलमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत अ‍ॅड. देसाई यांनी मतदार वकिलांचे आभार मानत आपल्या आगामी कार्याची रूपरेषा जाहीर केली. यावेळी देसाई यांच्या पत्नी ऍड. गौरी देसाई, जिल्हा बारचे अध्यक्ष ऍड. परिमल नाईक, सचिव ऍड. विवेक मांडकुलकर, ऍड. यतिश खानोलकर, ऍड. अमोल सामंत, कुडाळचे अध्यक्ष ऍड. गौरव पडते, ऍड. रुपेश परुळेकर उपस्थित होते.

निवडणुकीच्या गणितावर बोलताना अ‍ॅड. संग्राम देसाई म्हणाले की, बार कौन्सिलमध्ये दरवर्षी २५ उमेदवार निवडून येत असतात. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार यंदा ३० टक्के महिला आरक्षण ठेवण्यात आले होते, ज्यामध्ये ७ महिला रिंगणात होत्या. या निवडणुकीसाठी सुरुवातीला २ लाख ४० हजार वकिलांची नोंदणी होती, मात्र कठोर व्हेरिफिकेशननंतर १ लाख ७० हजार वकील मतदानासाठी पात्र ठरले. एकूण १५५ उमेदवार नशीब आजमावत होते. रिंगणात दोन-तीन वेळा निवडून आलेले प्रस्थापित उमेदवार असतानाही, मतदारांनी आपल्याला सहाव्या क्रमांकाची सर्वाधिक पसंतीची मते दिली. या यशाबद्दल त्यांनी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा आणि मुंबई येथील सर्व वकील बंधू-भगिनींचे जाहीर आभार मानले.

पत्रकार परिषदेत अ‍ॅड. संग्राम देसाई यांनी वकिलांच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या. ते म्हणाले कोल्हापूर येथील हायकोर्टाचे सर्किट बेंच कायमस्वरूपी (पर्मनंट) करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार. बार कौन्सिलला मिळालेल्या स्वतःच्या जागेवरील इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ऍड. देसाई म्हणाले.

देशातील नवनिर्वाचित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स ट्रेनिंग अँड अकॅडमी रिसर्च सेंटर’ (तळोजा) या इमारतीत तरुण वकिलांना चांगल्या पद्धतीचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल. तसेच महाराष्ट्र शासनाला कायदे तयार करताना विधीमंडळात लागणारी मदत पुरवण्यासाठी एक मजबूत ‘रिसर्च टीम’ तयार करण्यात आली आहे. वकिलांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘अ‍ॅडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट’बाबत लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वकिलांना आरोग्य संरक्षण मिळण्यासाठी मेडिक्लेम आणि दुर्दैवी घटनेत कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी म्हणून ‘डेथ क्लेम’साठी विशेष फंड उभारण्यात येणार आहे. तसेच नवीन तरुण वकिलांसाठी पहिली ५ वर्षे खूप कठीण आणि संघर्षाची असतात, म्हणूनच त्यांना ‘स्टायपेंड’ (विद्यावेतन) कसा देता येईल, यासाठी एक निश्चित प्रोसेस तयार करण्यावर आपला भर असेल असे ऍड. संग्राम देसाई यांनी सांगितले.

मी कोणताही राजकीय अजेंडा मनात न ठेवता सर्वपक्षीय लोकांना एकत्र घेऊन काम केले आणि मला वकिलांशिवाय समाजाच्या सर्वच स्तरातून मोठी मदत झाली, असे देसाई यांनी आवर्जून सांगितले. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे यांच्या मोलाच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.

तसेच ऍड. देसाई यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे विशेष आभार मानले. उदय सामंत यांनी आजच्या घडीला कोट्यवधी रुपये किंमत असलेली अडीच एकर जागा ट्रेनिंग सेंटरसाठी नाममात्र रकमेत उपलब्ध करून दिली आहे. विजयाची बातमी मिळताच मुख्यमंत्र्यांनीही फोन करून अभिनंदन केल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!