दिनांक 2 जुलै 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एम.आय.डी.सी. भूखंड वाटप,वाटप केलेल्या भूखंडामध्ये उद्योगधंदे सुरू होणे व इतर समस्यांच्या निवारणासाठी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री माननीय नामदार श्री. उदयजी सामंत यांच्या अध्यक्षतेखाली माननीय श्री. दीपकभाई केसरकर, आमदार, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ यांच्या आग्रही मागणीवरून व त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवन येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये पुढील निर्णय घेण्यात आले.
1) आडाळी एम.आय.डी.सी. मध्ये ज्या उद्योजकांनी भूखंड खरेदी केले होते.त्यांचा भूखंड ताबा देणे,करार करून बांधकाम परवानगी देणे इत्यांदी बाबिंना स्थगिती देण्यात आली होती. आजच्या बैठकीमध्ये सदरची स्थगिती उठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
2) आडाळी एम.आय.डी.सी. मध्ये इच्छुक उद्योजकांना भूखंड घेण्यासाठीची ऑनलाईन प्रक्रिया दोन आठवड्यात सुरू करणे बाबत निर्णय घेण्यात आला असून ज्या उद्योजकांना आता नव्याने भूखंड घ्यावयाच्या आहे त्यांनी या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावयाचे आहे.
3) आडाळी एम.आय.डी.सी. परिसरातील प्रस्तावित गोल्फ कोर्स प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
4) आडाळी एम.आय.डी.सी. मध्ये उद्योगधंदे वाढावेत व गुंतवणूक वाढावी, उद्योजक आकर्षित व्हावेत यासाठी येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये गोवा येथे गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले आहे.
5) सद्यस्थितीत एम.आय.डी.सी. चे मुख्य कार्यालय रत्नागिरी येथे असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजकांना रत्नागिरी येथे वारंवार जावे लागत असे. उद्योजकांसाठी हे गैरसोयीचे होत होते. आता आडाळी येथे दर गुरुवारी एम.आय.डी.सी.च्या विभागीय कार्यालयातील अधिकारी उद्योजकांच्या कार्यालयीन कामकाजासाठी उपलब्ध असणार आहेत. आजच्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला आहे.
6) आडाळी एम.आय.डी.सी. मधील विद्युत पुरवठ्यासाठी उभारण्यात आलेल्या विद्युत उपकेंद्राचे काम पूर्ण होऊन सुरू झाले होते. परंतु इन्सुली ते आडाळी पर्यायी 33 के व्ही वीज वाहिनीचे काम संथ गतीने चालू असले बाबत चर्चा करण्यात आली. सदर काम लवकरात लवकर जलद गतीने पूर्ण होण्या संदर्भात आजच्या बैठकीत संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले.
7) आडाळी एम.आय.डी.सी. परिसरात लागून असलेल्या तिलारी पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचा वापर करून त्याद्वारे काही उद्योग व्यवसाय (उदाहरणार्थ- डाटा सेंटर किंवा तत्सम उद्योग) उभारण्याबाबत पाहणी करून अहवाल सादर करणेबाबत निर्देश देण्यात आले.
8)तसेच आडाळी एम.आय.डी.सी. मधील इतर समस्यांबाबत सकारात्मक चर्चा करून आडाळी एमआयडीसीला चालना देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला उद्योग विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सह मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य अभियंता (मुख्यालय), सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (ऑनलाइन उपस्थिती), उद्योग विभागाचे सहसचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई चे महाव्यवस्थापक (भूमी), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
आपल्या आग्रही मागणीनुसार उद्योग मंत्री मा.ना.श्री. उदय सामंत यांनी तातडीने बैठक घेऊन आडाळी एम.आय.डी.सी. समस्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल आमदार श्री. दीपक केसरकर यांनी मंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
