लांबलेला पाऊस, वातावरणातील बदल, अवेळी पडून गेलेला पाऊस, वन्य प्राणी यामुळे शेतकरी आणि आंबा आणि काजू व्यावसायिक आर्थिक अडचणीत आला आहे.शेतकरी आणि लहान व्यापारी यांसाठी अस्मानी संकट हे नवीन नाहीत मात्र कोकणातील शेतकरी आणि इतर ठिकाणच्या शेतकरी यामध्ये थोडासा फरक नक्कीच पाहायला मिळतो. इतर ठिकाणी एकोरोनी जमीन पाहायला मिळते मात्र ती परिस्थिती कोकणामध्ये नाही. तुकड्या तुकड्या मध्ये शेती विभागली गेली आहे. इथला शेतकरी जास्तीत जास्त हंगामी शेतीवर अवलंबून पाहायला मिळत आहे. पावसाळ्यात भात शेती, थंडीच्या दिवसात कुळीद, उडीद, चवळी तर काजू आणि आंब्याच्या हंगामामध्ये काजू आणि आंब्याचे उत्पन्न. बारमाही उत्पन्न देणारे पीक शक्यतो कोकणामध्ये फारसे उपलब्ध नाही. अश्यात इथला शेतकरी जीवाचं रान करून आणि आल्या परिस्थितीला तोंड देत शेती करत आहे.गेल्या वर्षीचा विचार करता ऐन उत्पादनाच्या वेळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे कोकम आंबा, काजू,फणस यांसारख्या हंगामी पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या अडचणीतून अजून बरेच शेतकरी बाहेर पडले नाही आहेत. त्या अडचणीत अजून भर पडली ती अवेळी पावसाची. अवेळी पडलेल्या पावसाने आणि वातावरणाच्या लहरीपणामुळे आंबा, काजू यांना आलेला मोहोर जळून गेला. परिणामी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उत्पन्नात फार मोठ्या प्रमाणात घट होण्याची चिन्हे आहेत. ज्याप्रमाणे इतर ठिकाणी पीक नुकसान भरपाई दिली जाते त्याचप्रमाणे ती इथल्या शेतकऱ्यांना मिळणे गरजेचे आहे. कितीही मोठ संकट आलं तरी इथला शेतकरी कधीही आत्महत्या करत नाही. कर्जांचा डोंगर डोक्यावर असला तरी मिळणाऱ्या उत्पादनातून तो ते कर्ज प्रामाणिकपणे भरत असतो.मात्र वेळोवेळी कोकणातील शेतकऱ्यांवर दुर्लक्ष केला गेला आहे. आसमानी संकट कमी होते की काय त्यात वन्यप्राण्यांची भर पडली आहे. अनेक वन्य प्राणी शेतीचे नुकसान फार मोठ्या प्रमाणात करताना पाहायला मिळत आहेत.अशावेळी इथला शेतकरी हवालदिल झाला आहे. काही शेतकऱ्यांनी आपली शेती करायचं सोडून दिल आहे. अशावेळी शासन स्तरावरून शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे. इथला शेतकरी आपल्या परिस्थितीला कधीही रडत बसत नाही,तो नेहमीच प्राप्त परिस्थितीनुसार आपले जीवन जगत आहे.मात्र शासनाने याचा विचार करून जास्तीत जास्त शेतकरी छोटे व्यापारी यांना नुकसान भरपाई मिळवून दिली पाहिजे.
