जात, पंथ आणि उपजातींच्या चौकटीत अडकून न राहता केवळ हिंदू म्हणून एकत्र येणे ही आजच्या काळाची गरज असून, हिंदू समाजाची एकजूट हीच त्याची खरी ताकद आहे, असे प्रतिपादन सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांनी केले. ते मळगाव येथे आयोजित सकल हिंदू संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

मळगाव येथील शालू मंगल कार्यालयात हिंदू संमेलन समन्वय समिती मळगाव दशक्रोशीच्या वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. हिंदू समाजात एकात्मता निर्माण करणे, धर्मजागृती घडवणे आणि भावी पिढीपर्यंत संस्कारांची परंपरा पोहोचवणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.

कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रतिमा व भारतमाता यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह.भ.प. लक्ष्मण कडव उपस्थित होते. तसेच संयोजक शेखर पाडगावकर, सहसंयोजिका रंजना तेली, महेश पंतवालावलकर, हेमंत खानोलकर, भगवान रेडकर, मनीषा नाटेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. ठाकरे व लक्ष्मण कडव यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

मार्गदर्शन करताना डॉ. ठाकरे यांनी समाजातील वाढत्या अपप्रवृत्तींचा उल्लेख करत धर्मसंरक्षणाची सुरुवात आपल्या गावापासून व कुटुंबापासून झाली पाहिजे, असे सांगितले. मुलींना सुरक्षित वातावरण देणे ही प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेचा संदर्भ देत त्यांनी सामाजिक ऐक्याचे महत्त्व अधोरेखित केले. ‘नागरिक मी या देशाचा’ या कवितेच्या माध्यमातून नागरिकांच्या अपेक्षा आणि कृतीतील तफावत त्यांनी प्रभावीपणे मांडली. भाषणाच्या शेवटी एका रूपककथेच्या माध्यमातून “एकजुटीतच सुरक्षितता आहे” हा संदेश त्यांनी दिला.

प्रास्ताविकात शेखर पाडगावकर यांनी जात-पात विसरून हिंदू म्हणून जगण्याचे आवाहन केले. ह.भ.प. लक्ष्मण कडव यांनी भगवद्गीतेचे महत्त्व विशद करत प्रत्येक हिंदू कुटुंबात गीता असावी आणि तिचे नियमित वाचन व्हावे, असे सांगितले.

संमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. गायक हेमंत गोडकर आणि मुग्धा पंतवालावलकर यांनी सुगम संगीत सादर केले. अंकुश आजगावकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाड्याद्वारे उपस्थितांची मने जिंकली. हर्षिता राऊळ आणि खुशी लातये यांनी मर्दानी लाठी-काठीचे प्रात्यक्षिक सादर केले. तसेच दुर्ग मावळा प्रतिष्ठान व दुर्ग रक्षक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून इतिहास अभ्यासक ज्ञानेश्वर राणे यांनी शिवकालीन शस्त्रे आणि दुर्मीळ पुस्तकांचे प्रदर्शन भरविले होते.

कार्यक्रमातील सर्व सहभागी कलाकारांचा श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन मनीषा नाटेकर-राऊळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन रंजना तेली यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रमाला मळगाव व परिसरातील हिंदू बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी हिंदू संमेलन समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!