खरंतर केवळ एक दिवस हा आईचा नसतो तर आपल्या आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस हा आई मुळे असतो. त्यामुळे केवळ एक दिवस मातृदिन साजरा करून आपण आपल्याच आईच महत्व कमी करत असतो ..
असं म्हणतात की स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. हे खरंच आहे. मुळात हे जग जर तुम्हाला बघायचं असेल तर जन्माला यावं लागेल. ते शक्य आहे फक्त आईमुळे. नऊ महिने अतोनात त्रास सहन करत ती तुम्हाला गर्भात वाढवत असते. जेवढी काळजी तिला आपली नसते, तेवढी काळजी ती गर्भातील त्या जीवाची करत असते.
बागेमध्ये फुल आणि बाईच्या खांद्यावर मूल असल्याशिवाय पूर्णत्व प्राप्त होत नाही. ज्याप्रमाणे कितीही मोठी बाग असली तरी तिला फुलांशिवाय शोभा नाही त्याचप्रमाणे एखाद्या स्त्रीला मातृत्वाशिवाय शोभा नाही. मुलगा किव्हा मुलगी असा भेदभाव एखादी आई कधीही करत नाही. कारण जन्म देताना होणारा त्रास हा सारखाच असतो.
आईची रूपे सुद्धा आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतात. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ती अनेक रूपात वावरत असते. सकाळी उठून नाष्टा, जेवण, साफसफाई ही घरातील कामे करताना, त्याचप्रमाणे एखादा जॉब करताना ऑफिस मधील ताण हे सगळंच ती करत असते. तिला विश्रांती ही कधीच पाहायला मिळत नाही.
आपली संस्कृती मातृदेव भव, पितृदेव भव अशी आहे. अनादी कालापासून आईच महत्व अधोरेखित आहे. समजा आपण केवळ एकच दिवस आई साठी साजरा केला त्याचप्रमाणे तिने आपल्या आयुष्यात केले तर.. केवळ मातृदिनी आपण तुमची सर्वांची काळजी घेईन, जेवण, नाष्टा करीन, घरातील कामे करीन, येणारी आव्हाने फक्त एक दिवस स्वीकारेन असं तिने ठरवलं तर काय होईल याचा विचार करा.
आज जग झपाट्याने बदलत चाललं आहे. अनेक शोध लागत आहेत. मात्र जन्म घेण्यासाठी अजून तरी गर्भाशय लागते. याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. पाश्चात्य संस्कृती चा वापर आज मोट्या प्रमाणात आपण आपल्या जीवनात अवलंबवत आहोत. आज प्रत्येकजण आई किव्हा वडील यांचा तुम्ही आम्हाला जन्माला घालून काही उपकार नाय केले अशी भावना होत चालली आहे. यांचमुळे आज वृद्धाश्रम वाढत चालले आहेत. आपला आई – वडील यांच्याप्रति असलेला दृष्टीकोन बदलत चालला आहे. हा दृष्टीकोन आपण बदलणं गरजेचे आहे.ज्यांनी आपल्याला जन्म दिला, जिने आपल्याला नऊ महिने आपल्या गर्भात वाढविले, अनेक आव्हाने, संकटाना सामोरे जात तिने आपल्याला हे जग दाखविले त्यांचा कोणताही एक दिवस नसतो.
यांचमुळे आई साठी एक दिवस नसतो तर येणारा प्रत्येक दिवस हा आईमुळे असतो हे लक्षात ठेवून जर आपण जगलो तर आपण धन्य झालो. आईच्या ऋणातून कोणीही मुक्त झाला नाही आणि कधी होणार देखील नाही. तिची सेवा, काळजी, तीचा सन्मान केला गेला तरी तिच्यासाठी आपल्याला जन्माला घातल्याचे सार्थक होईल..
