०१-०७-२०२६ रोजी शरद कृषी भवन येथे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची ४३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. सभेच्या प्रारंभी महाराष्ट्राचे हरितक्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस उपाध्यक्ष श्री. आर.टी. मर्गज यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांनी उपस्थितांना बँकेच्या ४३ व्या वर्धापन दिनाच्या तसेच महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. गेल्या ४३ वर्षांत बँकेच्या जडणघडणीत आणि प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व माजी व विद्यमान पदाधिकारी, संचालक, अधिकारी, कर्मचारी, सभासद आणि हितचिंतकांचे त्यांनी आभार मानले. त्यांच्या योगदानामुळेच सिंधुदुर्ग जिल्हा बँक आज यशाच्या शिखराकडे वाटचाल करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या तीन वर्षांत सभासदांना दिलेली सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्यात बँकेला यश आले असून, येत्या दोन वर्षांत सिंधुदुर्ग जिल्हा बँक 10 हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा निश्चितपणे पार करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बँक नेहमीच विद्यार्थी, महिला आणि विविध सामाजिक घटकांसाठी अनेक लोकहिताचे उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. विकास संस्थांच्या कामकाजात पारदर्शकता यावी यासाठी बँकेने आवश्यक ते सहकार्य केले असून, विकास संस्थांच्या संगणकीकरणामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविल्याचा गौरवही त्यांनी नमूद केला.
बँकेमार्फत स्वयं-सहाय्यता बचत गट (SHG) सक्षमीकरणासाठी विविध कर्ज योजना व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी बँकेमार्फत १० लाख रुपयांपर्यंत कर्जपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच बँकेने राबविलेल्या कुपोषणमुक्ती अभियानातून ५२ हून अधिक बालके कुपोषणमुक्त झाल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा बँकेच्या शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घेऊन अनेक विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण घेत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
जिल्ह्यातील सहकार अधिक सक्षम होणे ही काळाची गरज असल्याचे सांगत, बँकेच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने ‘वैकुंठभाई मेहता सर्वोत्कृष्ट पुरस्कार’ प्रदान करून गौरव केल्याचे त्यांनी नमूद केले. हा सन्मान बँकेच्या सातत्यपूर्ण प्रगतीची पावती असून, आगामी काळात १० हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठण्यासाठी सर्व सभासद, संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि ग्राहकांनी पूर्वीप्रमाणेच साथ व सहकार्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. प्रमोद कामत, बँकेचे उपाध्यक्ष श्री. अतुल काळसेकर, सर्वश्री संचालक गजानन गावडे, दिलीप रावराणे, व्हिक्टर डान्टस, आत्माराम ओटवणेकर, विद्याप्रसाद बांदेकर, महेश सारंग, समीर सावंत, संदीप परब, सुशांत नाईक, विद्याधर परब, गणपत देसाई, विठ्ठल देसाई, प्रकाश मोर्ये, मेघनाद धुरी, प्रकाश बोडस, रविंद्र मडगावकर, श्रीम. नीता राणे, श्रीम. तसेच बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. अनिरुद्ध देसाई व उपमुख्यकार्यकारी अधिकारी श्री. प्रमोद गावडे उपस्थित होते.
