फिटनेस योग फाउंडेशनच्या वतीने आयोजित योग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन मंगळवारी (दि. ३० जून) सायंकाळी जिमखाना हॉल, सावंतवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाले. या शिबिराच्या उद्घाटक म्हणून सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना श्रद्धाराजे भोसले यांनी योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व अधोरेखित केले. आजच्या धकाधकीच्या जीवनात तरुणांनी योगाचा स्वीकार करून निरोगी जीवनशैली अंगीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाला योगशिक्षक शेखर बांदेकर, नगरसेविका सीमा नाईक, फिटनेस योग अकॅडमीचे जिल्हाध्यक्ष शैलेश बांदेकर, फिटनेस महिला अकॅडमीच्या जिल्हाध्यक्षा रसिका सावंत, पञकार विनायक गवस, एकनाथ पाटील सर तसेच रश्मी बांदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात शेखर बांदेकर यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट करत महर्षी पतंजली यांच्या योगसूत्रांवर आधारित शिस्तबद्ध व सर्वांगीण प्रशिक्षण या शिबिरामध्ये दिले जाणार असल्याची माहिती दिली.
फिटनेस योग फाउंडेशनच्या हिरकणी, महालक्ष्मी, वटसावित्री, एकमुखी दत्तमंदिर व वाटवे हॉल या पाच योगवर्गांतील योगशिक्षक व साधकांनी शिबिरात सहभाग घेतला. अधिकाधिक योगप्रेमींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल लातये यांनी केले, तर आभार रवींद्र प्रभुदेसाई यांनी मानले.
