मुंबई विद्यापीठाच्या ५९व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाची सिंधुदुर्ग विभागीय फेरी सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या फेरीत कणकवली कॉलेजने १४ स्पर्धा प्रकारांत प्रथम, ७ प्रकारांत द्वितीय आणि एका प्रकारात उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवत सर्वाधिक यश संपादन केले. त्यामुळे कणकवली कॉलेजने विभागीय फेरीची जनरल चॅम्पियनशिप पटकावली.

विभागीय फेरीत जिल्ह्यातील २८ महाविद्यालयांमधील ५५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. नृत्य, संगीत, साहित्य, नाट्य आणि ललित कला अशा विविध कलाप्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. दिवसभर विविध स्पर्धांमुळे यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या परिसरात उत्साहाचे वातावरण होते.

या स्पर्धेत यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची विद्यार्थिनी पूजा सावंत हिने इंग्रजी वक्तृत्व गट ‘ब’मध्ये प्रथम क्रमांक मिळवला. निधी जोशी हिने भारतीय शास्त्रीय गायन (एकल) प्रकारात उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. या दोन्ही विद्यार्थिनींची मुंबई येथे होणाऱ्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य धनेश सावंत, लखमराजे भोसले, सांस्कृतिक समन्वयक निलेश सावे, श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीचे सचिव संजीव देसाई, जिल्हा युवा महोत्सव समन्वयक डॉ. आशिष नाईक आणि डॉ. नितीन वळंजू उपस्थित होते. तसेच भोसले नॉलेज सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लेफ्टनंट कर्नल डॉ. रत्नेश सिन्हा, डॉ. विजय जगताप, डॉ. रमण बाणे, कार्यक्रम समन्वयक प्रा. बॉनी शेरॉव्ह आणि प्रा. स्वागत केरकर उपस्थित होते.

दिवसभर झालेल्या विविध स्पर्धांनंतर रात्री उशिरा पारितोषिक वितरण समारंभ झाला. सर्वाधिक पारितोषिके मिळवत कणकवली कॉलेजने विभागीय फेरीत आपले वर्चस्व सिद्ध केले. तर वायबीआयटीच्या पूजा सावंत आणि निधी जोशी यांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळवत संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!