यावर्षी झालेल्या अल्प पावसामुळे न्हावेली गावात गंभीर दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या अभावामुळे येथील भातशेतीसह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सुष्मिता जाधव, गटविकास अधिकारी निलेश जाधव याच्यासह पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.
न्हावेली परिसरातील पिकांची पाहणी केल्यानंतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. पावसाअभावी झालेल्या या नुकसानीची गांभीर्याने दखल घेत, बाधित शेतकऱ्यांना १००% नुकसान भरपाई देण्याचे स्पष्ट आश्वासन सभापती श्रीम. सुष्मिता जाधव यांनी दिले.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सागर धाऊसकर, आरती माळकर यांच्यासह गावातील बाधित शेतकरी उपस्थित होते. लोकप्रतिनिधी व प्रशासनाने थेट बांधावर येत पाहणी करून मदतीचे आश्वासन दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.