आगामी पावसाळा तोंडावर आल्याने सावंतवाडी नगरपालिकेने शहरात मान्सूनपूर्व कामांना जोरदार सुरुवात केली आहे. पावसाळ्यात शहरात कुठेही पाणी साचून नागरिकांना त्रास होऊ नये, याबाबत नगराध्यक्षा श्रद्धाराजे लखम सावंत भोंसले यांनी केलेल्या सूचनेनुसार प्रशासनाने विशेष नालेसाफसफाई मोहीम हाती घेतली असून सध्या ही कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वी सावंतवाडी शहरात कुठल्याही प्रभागात नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी आतापासूनच पावले उचलण्यात आली आहेत अशी माहिती आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी दिली
पावसाळ्यात शहरातील सखल भागात पाणी साचणे, गटारे तुंबणे अशा समस्यांमुळे दरवर्षी नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. हीच बाब गांभीर्याने घेत नगराध्यक्षांनी प्रशासनाला पावसाळ्यापूर्वी सर्व छोटे-मोठे नाले आणि गटारे पूर्णपणे साफ करण्याचे आदेश दिले होते. या सूचनेचे पालन करत पालिकेच्या स्वच्छता विभागाने कर्मचाऱ्यांमार्फत शहरातील मुख्य आणि अंतर्गत नाल्यांमधील गाळ, कचरा आणि प्लास्टिक उपसण्याचे काम सुरू केले आहे.
पाणी साचणाऱ्या हॉटस्पॉट्सवर विशेष लक्ष-
दरवर्षी पावसाळ्यात ज्या भागात सर्वाधिक पाणी साचते किंवा पूरसदृश परिस्थिती निर्माण होते, अशा **’हॉटस्पॉट्स’**वर प्रशासनाने यंदा विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
पावसाळ्यात सावंतवाडीकर नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची संपूर्ण दक्षता पालिका प्रशासन घेत आहे. नालेसाफसफाईचे काम दर्जेदार व्हावे आणि वेळेत पूर्ण व्हावे, यावर नगरपालिका प्रशासन व आरोग्य विभाग तसेच सर्व नगरसेवक यांचा बारीक लक्ष आहे
नागरिकांचे सहकार्य अपेक्षित
प्रशासनाने मोहीम हाती घेतली असली, तरी नागरिकांनीही नाल्यांमध्ये किंवा उघड्या गटारांमध्ये प्लास्टिक, कचरा टाकू नये, असे आवाहन करण्यात येत आहे . शहराचे आरोग्य राखण्यासाठी आणि पावसाळा सुसह्य करण्यासाठी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे, . साचलेल्या कचऱ्यामुळे कुठेही साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी साफसफाईसोबतच जंतुनाशक फवारणी देखील केली जाणार आहे असे त्याने स्पष्ट केले..
