७ जून रोजी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अभिनेत्री विभागातून वर्षा उसगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर संगीत क्षेत्रातून आनंद शिंदे बिनविरोध निवडून आले तसेच व्ही एफ एक्स विभागातून विजय खोचिकर बिनविरोध निवडून आले. नृत्य विभागातून सुभाष नकाशे यांना जास्त मतं मिळाली. निर्माता विभागातून मेघराज राजे भोसले यांना 951 मतं मिळाली असून विजयाचा गुलाल उधळलेला बघायला मिळाला.
दिग्दर्शक विभागातून दीपक कदम यांना 846 मतं मिळाल्याने त्यांना विजयी घोषित केले. अभिनेता साहस दृश्य विभागातून आनंद काळे आणि सुशांत शेलार यांच्यात चूरशीची लढत झाली. आनंद काळे यांना 631 मतांवर समाधान मानावे लागले तर 891 मतं मिळाल्याने सुशांत शेलार यांनी या लढतीत बाजी मारलेली बघायला मिळाली.
या निवडणुकीच्या धमधूमीत विजय पाटकर यांना इच्छा असूनही उमेदवारीचा अर्ज भरता आला नव्हता. तर अभिनेत्री नीलम शिर्के यांनी देखील वर्षा उसगावकर यांना पाठिंबा दर्शवत निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यामुळे तब्बल 7 वर्षानंतर अखिल भारतीय महामंडळाची निवडणुक संपन्न झाल्याने सगळ्यांनी आता निश्वास टाकला आहे.
