सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील सावडाव येथे माहिती अधिकार (RTI) व सामाजिक कार्यकर्त्या सौ. नयना वैभव सावंत यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या अल्टो कारची तोडफोड करण्यात आल्याची घटना मंगळवार, २३ जून २०२६ रोजी घडली आहे. याप्रकरणी संशयित इसम सावडावचे उपसरपंच दत्ताराम मनोहर काटे, व्यंकटेश हरी वारंग आणि दिनेश तुकाराम नेवरेकर यांच्याविरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सौ. नयना सावंत आणि त्यांचे पती सावडाव ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराविरोधात माहिती अधिकारांतर्गत कायदेशीर लढा देत आहेत. यापूर्वी १३ एप्रिल २०२५ रोजी देखील सावंत कुटुंबियांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या जुन्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, आता पुन्हा एकदा त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने सावंत कुटुंबियांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.याच ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराचा लढा सुरू ठेवल्याच्या रागातूनच संशयितांनी हा पूर्वनियोजित कट रचल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. संशयितांनी २३ जून रोजी सावंत यांच्या घरासमोरील जागेत बेकायदेशीर प्रवेश केला आणि त्यांच्या मारुती सुझुकी अल्टो कारची पुढील काच फोडून नुकसान केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत..
