स्थानिक उमेदवारीवरून तळवडे जिल्हा परिषद मतदार संघात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. निवडणुकीच्या आणि प्रचाराच्या अंतिम टप्प्यात हे आरोप आणखीनच वाढत जाताना पाहायला मिळत आहेत. अश्यातच भाजप पक्षाने उच्च शिक्षित उमेदवार हा मुद्दा पुढे आणला. मात्र यावर ठाकरे सेनेचे तळवडे जिल्हा परिषद सदस्य पदाचे उमेदवार रुपेश राऊळ यांनी जोरदार समाचार घेतला. ज्या भाजपच्या ३ कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरले होते आणि नाईलाजाने ज्यांना ते मागे घ्यावे लागले ते उच्च शिक्षित नव्हते का? केवेळ आर्थिक बाजू कमजोर असल्याने त्यांना डावलले गेले हे आता हळू हळू लोकांना कळू लागलं आहे. याच स्थानिक लोकांचा मला मिळत असलेला पाठिंबा लक्षात घेता याप्रकारचे आरोप आता सुरु झाले आहेत.केवळ माझ्याकडे पैसा आहे, तो वापरून मी हवं ते करणार, पैशाने लोकांना विकत घेणार हा जो प्रकार चालू आहे त्याला इथली स्थानिक जनताच उत्तर देईल. ज्याचं नाव या जिल्हा परिषद मतदारसंघ यादीमध्ये नाही अश्या लोकांना स्थानिक कस म्हणता येईल असा प्रश्नही रुपेश राऊळ यांनी व्यक्त केला.
इथली जनता ही स्वाभिमानी आहे. पैशाने ती विकली जाणारी नाही आहे. पैशाचं खेळ करून केवळ ज्यांच्याजवळ निष्ठा, स्वाभिमान नाही अश्या लोकांना विकत घेता येत मात्र ज्यांची संपूर्ण हयात स्वाभिमानी जगण्याने गेली अश्या लोकांना तुम्ही पैशाने कधीच विकत घेवू शकत नाही असा जोरदार टोला रुपेश राऊळ यांनी विरोधकांना लगावला.यावेळी समीर नाईक युवासेना युवा प्रमुख- मळेवा,बाळा शेर्लेकर- ग्रामपंचायत सदस्य, लवू नाईक आदि पदाधिकारी उपस्थित होते.

