कोकण बोर्ड झाल्यापासून कोकण विभागाचा डंका आपल्याला पाहायला मिळत आहे.अनेक विद्यार्थी दहावी बारावी मध्ये मोठ्या प्रमाणात चांगले टक्केवारी घेऊन उत्तम यश संपादन करत आहेत. मात्र हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळत आहेत. स्पर्धा परीक्षांचा हवा तेवढा प्रचार व प्रसार आपल्या कोकण पट्ट्यामध्ये पाहायला मिळत नाही, परिणामी स्पर्धा परीक्षांकडे विद्यार्थी दुर्लक्ष करताना पाहायला मिळत आहेत.आयपीएस अधिकारी होण्याचं स्वप्न जर एखादा विद्यार्थी बघत असेल त्याच्यामध्ये ती क्षमता असेल मात्र त्यासाठी त्याला पुणे कोल्हापूर मुंबई यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जावं लागत असेल तर त्या सारखे दुर्दैवी गोष्ट अजून कोणती असू शकेल याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आज आपण पाहत असलेले अनेक अधिकारी इतर राज्यातून इतर जिल्ह्यातून पाहायला मिळत आहेत, मात्र कोकणातील अधिकारी हे हातावर मोजणे इतकेच पाहायला मिळतील.आता जे अधिकारी झालेले आहेत त्यांनी एक तर कोल्हापूर किंवा मुंबई,पुणे या शहरांमध्ये जाऊन अभ्यास केलेला आहे त्यामुळे त्यांचं हे स्वप्न साकार झाले आहे.ज्यांची परिस्थिती असेल ते अशा मोठ्या शहरांमध्ये जाऊन स्पर्धा परीक्षा देऊ शकतात मात्र एखाद्या गरीब होतकरू विद्यार्थी असेल ज्याच्यामध्ये क्षमता असेल तो मात्र या मोठ्या शहरांमध्ये पैशा अभावी जाऊ शकणार नाही परिणामी क्षमता असून देखील त्याचं अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही.स्पर्धा परीक्षांसाठी एखादी अकॅडमी उभी राहणे गरजेचे बनत चालले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता अनेक हुशार विद्यार्थी या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतील. यांच्यामध्ये अभ्यास करण्याची ऊर्जा फार मोठ्या प्रमाणात आहे. मात्र स्पर्धा परीक्षांचे पुरेसं साधन उपलब्ध नसल्यामुळे त्यांना आपल्या इच्छा मारून पुढील शिक्षण पूर्ण कराव लागत आहे. स्पर्धा परीक्षांसाठी ज्याप्रमाणे कोल्हापूर, पुणे, मुंबई या मोठया शहरांमध्ये अकॅडमी उभारले जाते, तिथे अनेक अधिकारी घडवले जातात अशा प्रकारची अकॅडमी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी राजकीय,सामाजिक,शैक्षणिक चळवळ उभी राहणे गरजेचे आहे.केवळ स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन न करता सिंधुदुर्ग जिल्ह्यात एखादी अकॅडमी उभारून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांची गोडी निर्माण करून अधिकारी घडवण्याचे स्वप्न पूर्णत्वास नेण्याची वेळ आता आलेली आहे. अनेक विद्यार्थी दुसऱ्या राज्यात जाऊ शकत नाहीत मात्र दुसऱ्या राज्यातील अनेक अधिकारी आपल्या जिल्ह्यात येऊन प्रशासकीय यंत्रणा चालवत आहेत. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी आता आपल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून स्पर्धा परीक्षांमध्ये उतरणे गरजेचे बनत आहे. यासाठी कठोर मेहनत अत्यंत आवश्यक आहे. केवळ बोर्ड परीक्षा यामध्ये अडकून न राहता विद्यार्थ्यांनी आता आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न बघितले पाहिजे. यासाठी सर्वच राजकीय पुढाऱ्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अकॅडमी उभारून विद्यार्थ्यांच्या क्षमतांना उभारी देऊन त्यांना जे शैक्षणिक साहित्य लागेल ते उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.तरच आपला जिल्हा अधिकाऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जाईल. राज्यामध्ये जसा आपला पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जातो तसा अधिकाऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जावा यासाठी स्पर्धा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे गरजेचे बनत चालले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!