स्त्री शक्तीचा जागर आणि सन्मान” हे सूत्र डोळ्यासमोर ठेवून ग्रामपंचायत नानेली येथे १२ मार्च २०२६ रोजी ‘जागतिक महिला दिन’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महिला सक्षमीकरण, आरोग्य जनजागृती आणि क्रीडा गुणांना वाव देणाऱ्या या कार्यक्रमाने संपूर्ण नानेलीकरांचे लक्ष वेधून घेतले.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. “पहिली माझी ओवी गं…” या हृदयस्पर्शी ओवीने सावित्रीबाईंच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. वक्रतुंड स्वयंसहायता गटाने सुश्राव्य स्वागतगीत सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले.

बचत गटांचा उत्साह आणि सन्मान

या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे गावातील सर्व स्वयंसहायता बचत गटांच्या महिलांचे उत्स्फूर्त सहभाग आणि त्यांचे गुलाबपुष्प देऊन करण्यात आलेले स्वागत. यामध्ये प्रामुख्याने बचत गटाच्या सीआरपी (CRP) रेणुका भोई आणि मुख्य लिपिक सेविका साक्षी मेस्त्री यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी एकत्र येत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले.

मान्यवरांचे मार्गदर्शन

पंचायत समिती सदस्य श्री .योगेश धुरी यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी स्वयंसहायता गटांचे महत्त्व अधोरेखित करत महिलांना स्वावलंबी होण्याचे आवाहन केले. उपसरपंच प्रज्ञेश धुरी आणि विनायक कदम यांनीही महिलांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले.

कर्तृत्ववान महिलांचा गौरव (विशेष सन्मान)

गावाच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या महिलांचा शब्दसुमनांनी व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला:

शिक्षण क्षेत्र: गोलतकर मॅडम, ठाकूर मॅडम आणि साक्षी मेस्त्री.

आरोग्य व अंगणवाडी: आरोग्यसेविका गोडे मॅडम, आशा सेविका अर्पिता नियोगी,अंगणवाडी सेविका शिर्के मॅडम आणि मदतनीस रेणुका कदम. मदतनिस संचिता परब

प्रेरणादायी व्यक्तिमत्व: छाया धुरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. दिव्यांग असूनही जिद्दीने स्वतःचा उदरनिर्वाह करत आणि मुलींचे क्लासेस घेत त्यांनी आदर्श गृहिणी व शिक्षिका म्हणून समाजात स्थान निर्माण केले आहे.

निरोप व सत्कार: गावात दीर्घकाळ आरोग्य सेवा देणाऱ्या ममता पवार (सिस्टर) यांची बदली झाल्याने, त्यांच्या कार्याची कृतज्ञता म्हणून विशेष सत्कार करण्यात आला.

सरपंच व ग्रामसेविकांचे विशेष कौतुक

इकिगाई फाउंडेशन, सिंधुदुर्ग च्या वतीने सरपंच वंदना धुरी-आरेकर आणि ग्रामसेवक चेतना म्हाडगुत/माणगांवकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सरपंच वंदना मॅडम यांनी महिलांच्या प्रश्नांवर घेतलेली आक्रमक भूमिका आणि महिला कबड्डीला दिलेले प्रोत्साहन, तसेच ग्रामसेवक म्हाडगूत यांनी साधलेला प्रशासकीय समतोल याबद्दल त्यांचे कौतुक झाले.

खेळ आणि आरोग्याचा जागर

महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी उखाणे स्पर्धा, संगीत खुर्ची, लिंबू-चमचा आणि रस्सीखेच अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘बादलीत बॉल फेकणे’ ही अनोखी स्पर्धा रंगली. तसेच आरोग्यसेविका गोडे सिस्टर यांनी कर्करोग (कॅन्सर) जनजागृती, मासिक पाळीचे आरोग्य आणि वैयक्तिक स्वच्छता यावर सविस्तर मार्गदर्शन केले.

लोकवर्गणीतून सामाजिक ऐक्याचे दर्शन

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी योगेश धुरी, चेतना म्हाडगूत, सरपंच वंदना आरेकर, शिवाजी आरेकर, मुकुंद सावंत, प्रज्ञेश धुरी, रेणुका भोई, सिद्धेश धुरी, महिमा कदम, अर्पिता, योगी, दिव्या राऊळ, विनायक मेस्त्री, विनय कदम, वर्षा कसाबले, अनिकेत धुरी आणि संदेश आरेकर या सर्व स्वयंसेवकांच्या सांघिक प्रयत्नातून हा कार्यक्रम दिमाखात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!