सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळावा यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पुढाकारातून सहकाराच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील सुमारे २६ सहकारी संस्थांमध्ये काजू खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.

यासंदर्भात जिल्हा बँकेच्या सभागृहात विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांचे चेअरमन, सचिव तसेच काजू प्रक्रिया उद्योगातील प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष तुळशीदास रावराणे, उद्योजक दिपक ठाकूर, अच्युत कँश्यू इंडस्ट्रीचे मालक सुधीर झांट्ये तसेच जिल्ह्यातील सुमारे ४६ विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर काजू उत्पादन होत असून शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी सहकाराच्या माध्यमातून खरेदी-विक्रीची साखळी उभी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बैठकीत झालेल्या चर्चेनंतर जिल्ह्यातील सुमारे २७ सहकारी संस्थांनी काजू खरेदी केंद्र सुरू करण्यास सहमती दर्शवली आहे.

या निर्णयामुळे गावागावातील सहकारी संस्थांमार्फतच शेतकऱ्यांचा काजू माल खरेदी करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या गावातच काजू विक्रीची सुविधा मिळणार असून वाहतूक खर्च आणि अडचणी कमी होणार आहेत.

या संदर्भात १६ मार्च रोजी काजू प्रक्रिया उद्योगधारकांबरोबर स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असून त्यानंतर या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

सहकारी संस्थांच्या माध्यमातून गावागावात काजू खरेदी केंद्र सुरू झाल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांनी या उपक्रमाला सहकार्य करून आपला काजू माल या केंद्रांमार्फत विक्रीस द्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांना स्थिर बाजारपेठ मिळून त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!