शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ काळ ज्ञानदानाचे कार्य करून विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारे माध्यमिक विद्यालय झोळंबेचे मुख्याध्यापक एकनाथ बाबनी नाईक यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजल्यापासून माध्यमिक विद्यालय झोळंबे, ता. दोडामार्ग येथे हे रक्तदान शिबिर उत्साहात पार पडणार आहे.

मुख्याध्यापक एकनाथ नाईक यांच्या सेवानिवृत्तीचा प्रसंग केवळ सत्कार आणि शुभेच्छांपुरता मर्यादित न ठेवता समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करण्याचा स्तुत्य निर्णय माजी विद्यार्थ्यांनी घेतला आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान असून, एका रक्तदात्याच्या रक्तदानामुळे गरजू रुग्णाला जीवनदान मिळू शकते. हाच सामाजिक विचार डोळ्यांसमोर ठेवून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या रक्तदान शिबिराचे आयोजन सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, शाखा-दोडामार्ग व सावंतवाडी, माध्यमिक विद्यालय झोळंबेचे माजी विद्यार्थी तसेच आजी-माजी पालक, ग्रामपंचायत तळकट, फुकेरी व झोळंबे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

*रक्तदानासाठी सर्वांना खुले आवाहन*

या शिबिरात परिसरातील युवक, युवती, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी आणि रक्तदानाची इच्छा असलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. रक्तदानातून सामाजिक बांधिलकी जपत एका गरजू रुग्णाला जीवनदान देण्याचे पुण्य मिळवण्याची ही संधी असल्याने नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या रक्तदान शिबिरासंदर्भात अधिक माहितीसाठी माध्यमिक विद्यालय झोळंबेचे माजी विद्यार्थी जगदीश रामकृष्ण गवस यांच्याशी ९४२१२६५१५१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

शिक्षकांच्या सेवेचा गौरव रक्तदानाच्या पवित्र कार्यातून करण्याचा हा उपक्रम निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी ठरणार असून, झोळंबे परिसरात सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श निर्माण करणार आहे.

error: Content is protected !!