जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यावर अनेक धक्कादायक निकाल लागले. अनेक समीकरणे बदलली. अनेक आरोप प्रत्यारोप झाले. मात्र यात एक घृणास्पद आणि राजकारण कोणत्या थराला गेले अशी घटना घडल्याची लोकांमध्ये चर्चा आहे.जिल्हा परिषद मधील एका मतदार संघात पैसे आणि देवाचा फोटो घेऊन दारोदार फिरण्यात आले. लोकांची श्रद्धा होती. त्या श्रध्येचा गैरवापर करण्यात आला. एखादी निवडणूक जिंकताना साम, दाम, दंड आणि भेद यांचा वापर हा करावाच लागतो मात्र अश्या पद्धतीने जर निवडणुका जिंकल्या जात असतील तर याला नेमके काय म्हणायचे.लोकांना देवाची भीती दाखवून जर निवडणुका जिंकल्या जात असतील तर तो विजय नैतिकतेला धरून नक्कीच नाही हे स्पष्ट होते.एखाद्या उमेदवार कोणत्या देवाला मानतो, पूजतो हा त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार नक्कीच आहे. मात्र लोकांच्या भावनांशी खेळून जर त्यांच्या भक्तीचे बाजारीकरण होत असेल तर हे घातक आहे. नारळाला हात लावून शपथ घ्यायला लावणे यासारखे प्रकार म्हणजे आपल्या निष्क्रियतेचे दर्शन तो उमेदवार घडवत असतो. ज्यावेळी आपल्याकडे कोणतंही व्हिजन नसतं त्यावेळी लोकांच्या श्रद्धेचा वापर होताना पाहायला मिळतो. हाच वापर पुन्हा एकदा झाला.लोकशाहीने जसा मतदानाचा अधिकार दिला तसा आपल्याला प्रश्न विचारण्याचा देखील अधिकार दिलेला आहे. उद्या पुढे जाऊन ज्यावेळी उमेदवार विकास कामात कमी पडतील तेव्हा त्याच देवाचा फोटो घेऊन त्यांना निवडणुकीची आठवण जनतेने करून देणे गरजेचे आहे. उलट ज्यावेळी उमेदवार देवाची शपथ घेऊन मत घालायला सांगतो त्यावेळी आपण देखील त्याला तू त्याच देवाची शपथ घे आणि सांगितलेल्या आश्वासनांची पूर्तता करणार अशी शपथ घे सांगण्याची हिम्मत कोणी केली नसेल. मात्र ती करणे गरजेचे होते. ५ वर्षे आपण आपला गाव, आपला परिसर त्या व्यक्तीच्या ताब्यात देत असतो विकास करण्यासाठी. मात्र देवाची शपथ घेऊन त्याने तो केला तरच तो शब्दाचा पक्का उमेदवार असं मानावं लागेल.

